साधारणपणे ९०च्या उत्तरार्धात टेनिस विश्वात सर्वात खतरनाक असलेली दुहेरी जोडी म्हणजे लिएंडर पेस आणि महेश भूपती… १९९९पर्यंत ही जोडी जगात पहिल्या क्रमांकावर होती. पण त्यांच्या दुराव्यामुळे ही जोडी तुटली. मूळच्या या दोन मित्रांच्या कट्टर मैत्रीवर आणि त्यानंतरच्या घटनांवर आधारलेले कथानक लवकरच ‘ब्रेक पॉइंट’ या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. या दोघांविषयी पसरलेले गैरसमज आणि चर्चांना या वेबमालिकेमुळे पूर्णविराम मिळेल अशी आशा आहे. कारण पेस आणि भूपती त्यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या ब्रेकअपबद्दल स्पष्टपणे जगाला सांगतील की काय झाले, कसे झाले आणि का! ‘ब्रेक पॉईंट’ केवळ त्यांच्या महान टेनिस सामन्यांवरच नाही तर कोर्टवर आणि बाहेर त्यांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकणार आहे. ‘दंगल’, ‘पंगा’, ‘छिछोरे’, ‘नील बटे सन्नाटा’ वगैरे चित्रपटांचे निर्मिते अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांनी ही वेबसीरिज बनवली आहे. सात भागांची ‘ब्रेक पॉइंट’ नावाची ही मालिका लवकरच झी फाईव्ह या ओटीटी माध्यमावर सुरू होणार आहे. लिएंडर पेसने याविषयी म्हटले की, महेश आणि मी भारताला विश्व टेनिसच्या नकाशावर आणण्यासाठी कठोर मेहनत घेतली.आम्हाला आमची ही कहाणी जगासमोर मांडण्याची प्रथमच संधी मिळत आहे.