राजकारण आणि सत्ता यातला महत्त्वाचा भाग म्हणजे खुर्ची. या खुर्चीसाठी होणाऱ्या राजकारणाची झलक याआधी ‘सामना’, ‘सिंहासन’ आणि अलीकडच्या ‘धुरळा’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिलीच आहे. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या राजकारण्यांच्या वागणुकीमुळे सामान्य कुटुंबांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते तेही त्यात दिसले.
मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे प्रथमच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्येच खुर्चीसाठी करण्यात आलेली लढाई स्पष्ट जाणवतेय. ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईनसह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवीत आहे.
या चित्रपटात आर्यन संतोष हगवणे, अक्षय वाघमारे आणि श्रेया पसलकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीही या चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलू या सिनेमात दिसणार आहे.