स्वप्ने प्रत्येकजण पाहातो. ती पूर्ण होण्याची ते वाट पाहातात. त्यासाठी जीतोड मेहनतही घेतात. पण जेव्हा एक संपूर्ण कुटुंब एका स्वप्नावर पिढ्यान् पिढ्या अडकलेले असते आणि कधीतरी एके दिवशी ते पूर्ण व्हावे अशी त्यांची इच्छा असते तेव्हा काय होते? नेमके हेच दाखवणारी ‘उडारियां’ ही नवीन मालिका कलर्स या हिंदी मनोरंजन वाहिनीवर लवकरच सुरू होणार आहे.
पंजाबच्या मध्यवर्ती भागात असणारी ही कथा संधू कुटुंबियांचा प्रवास शोधणार आहे. ते कॅनडाला जाण्याचे स्वप्न पहात आहेत, पण नियतीने नेहमीच त्यांचे स्वप्न बिघडवले आहे आणि त्यांच्या योजना खराब केल्या आहेत. आता ते आपले हे स्वप्न त्यांच्या मुली जास्मिन आणि तेजोच्या रुपातून पहात आहेत. त्याही आता ते स्वप्न खरे ठरवण्याच्या अगदी जवळ पोचल्या आहेत. या मालिकेबाबत तेजो साकारणारी अभिनेत्री प्रियांका चहर म्हणाली, “माझा कलर्स सोबत हा पहिलाच शो आहे. या शोची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे.
माझे पात्र तेजो ही खूप साधी व ठाम मुलगी आहे, माझे व्यक्तिमत्व तिच्यासारखेच आहे, असेही ती स्पष्ट करते. जास्मिन साकारणारी ईशा मालवीय म्हणाली, या मालिकेद्वारे मी पदार्पण करत आहे. मालिकेत मी कॅनडाला जाण्याचे स्वप्न तसेच अनेक पंजाबी लोक पाहातात. त्यामुळे माझ्या पात्राशी ते संबंधित असतील, असेही ती सांगते.