केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर ठगांनी दोघांना चुना लावल्याची घटना घडली आहे. ऑनलाइन फसवणूक प्रकरणी पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे मरोळ परिसरात राहतात. गेल्या महिन्यात त्यांना एका नंबरवरून मोबाईलवर मेसेज आला. तुमचे मोबाईल अपडेट करण्यासाठी केवायसी कागदपत्रे हवी आहेत. जर ती न दिल्यास मोबाईल बंद केला जाईल, अशी भीती घातली. त्यानंतर तक्रारदारांनी त्या मेसेज आलेल्या नंबरवर फोन केला असता तो बंद होता.
दुसऱ्या दिवशी तक्रारदार हे घरी होते तेव्हा त्यांना फोन आला. मोबाईल पंपनीतून बोलत असून केवायसीसाठी बोलायचे आहे. पाच मिनिटांच्या आतमध्ये केवायसी कागदपत्रे अपडेट करू अशा भूलथापा मारून मोबाईलवर लिंक पाठवली. लिंक पाठवल्यावर प्ले स्टोअरमधून क्विक स्पोर्ट हे अॅप्स डाऊन लोड करण्यास सांगितले. ती लिंक ओपन केल्यावर 13 रुपये प्रोसेस फी म्हणून पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी 13 रुपये पाठवले. त्यानंतर फोन करणाऱ्या ठगाने दुसऱ्या खात्यातून पैसे पाठवण्यास सांगितले. काही वेळाने तक्रारदाराच्या दोन्ही खात्यातून 1 लाख 79 हजार रुपये काढले गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्या प्रकरणी त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठले.
तर केवायसीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला चुना लावल्याची घटना घडली. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते पवई परिसरात राहतात. तीन दिवसापूर्वी तक्रारदारांना मोबाईलवर फोन आला. जर मोबाईलचे केवायसी केले नाही तर खाते बंद होईल अशा भूलथापा मारल्या. केवायसी अपडेटसाठी तुम्हाला एक मेसेज येईल तो ओटीपी (वन टाइम पासवर्ड) शेअर करण्यास सांगितला. तक्रारदारांनी तो पासवर्ड शेअर केला. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून 2 लाख रुपये काढले गेले. त्यानंतर पुन्हा त्याचे 99 हजार रुपये काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठले. 2 लाख 99 हजारांची फसवणूक झाल्याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.