कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह करण्याची परंपरा खूपच जुनी आहे. काही लोक एकादशीच्या दिवशीच तुळशीचा विवाह करतात, तर काहीजण द्वादशीला तुळशी विवाह करतात. यंदा तुळशी विवाहाचा हा योग गुरुवारी २६ नोव्हेंबरला आला आहे.
तुळशीची पूजा वर्षभर केली जातेच, पण कार्तिक महिन्यात केली जाणारी तुळशीची पूजा आणि तुळशीसमोर दीवा लावणे मोठे फलदायी असते म्हणतात. यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते असेही म्हटले गेले आहे. कार्तिक महिन्याच्या कोणत्याही दिवशी भगवान विष्णूंवर तुळशीची पाने अर्पण केलीत तर गोदान केल्याचे फळ मिळते असे शास्त्र पुराणांत नमूद करण्यात आले आहे.
या वर्षी तुळशीचा विवाह गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी आहे. द्वादशी तिथीचा आरंभ २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी आहे, तर २७ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे ७ वाजून ४६ मिनिटांनी द्वादशी तिथी समाप्त होते.
असा करावा तुळशी विवाह
प्रबोधिनी एकादशी किंवा त्यानंतरच्या दिवशी द्वादशीला म्हणजे या दोन दिवसांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकाल. त्यासाठी पहाटे उठून प्रात:स्नान केल्यावर व्रताचा संकल्प सोडावा. त्यानंतर घरातल्या अंगणात तुळशीच्या झाडाजवळ उसाच्या कांड्यांनी मंडप बनवून त्यावर तोरणाने सजवावे. त्यानंतर तुळशीच्या रोपट्याला लाल रंगाची ओढणी घालावी. त्या ठिकाणी शृंगाराच्या आणखीही काही वस्तू ठेवल्या तर उत्तमच. मग तुळशीच्या झाडाजवळच भगवान विष्णू शाळीग्रामच्या रूपात ठेवावेत. त्यांना दूध आणि हळद अर्पण करावे.
तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टके जरूर म्हणावीत. त्यावेळी दोघांसमोर तुपाचा दीवा लावून तुळशी विवाहाची कथा वाचावी वा ऐकावी. यानंतर घरातील पुरुषाने शाळीग्रामांची मूर्ती हातात घेऊन तुळशीभोवती सात फेरे घ्यावेत. त्यानंतर शाळीग्राम भगवान पुन्हा तुळशीच्या शेजारी ठेवून द्यावेत. अखेरीस आरती करून आणि भगवान विष्णूंच्या पायांना स्पर्श करून सुख समृद्धीची कामना करावी. अशा पद्धतीने तुळशी विवाह संपन्न होतो.
तुळशी विवाहाची कथा
पुराणकथेनुसार, एकदा राक्षस कुळात एका सुंदर कन्येचा जन्म झाला. तिचे नाव वृंदा होते. वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूची पूजा करणारी आणि त्यांची मोठी भक्त होती. ती मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जालंधर नावाच्या एका असुराशी झाला. वृंदाच्या भक्तीमुळे जालंधराला आणखी जास्त शक्ती प्राप्त झाल्या. पण त्यामुळे तो केवळ मनुष्यजातीवर वा देवदेवतांवरच नव्हे, तर राक्षसांवरही अत्याचार करू लागला. यामुळे देवीदेवता आपले गार्हाणे घेऊन भगवान विष्णूंकडे गेले. म्हणून देवतांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप घेऊन वृंदाचा पतिव्रता धर्म नष्ट केला. त्यामुळे जालंधराच्या शक्ती कमी झाल्या आणि युद्धात तो मारला गेला. याची माहिती मिळताच वृंदाने भगवान विष्णूला त्यांच्या कपटाबद्दल त्यांना दगड बनण्याचा शाप दिला. सर्व देवीदेवता वृंदाला आपला शाप मागे घेण्याचा आग्रह करू लागले तेव्हा वृंदाने आपला शाप मागे घेतला, पण स्वत: मात्र अग्नीमध्ये भस्म झाली. भगवान विष्णूंनी वृंदाच्या राखेत एक रोपटे लावले आणि त्या रोपट्याला तुळशी असे नाव दिले. यानंतर ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा माझी पूजा केली जाईल, तेव्हा तुळशीचीही पूजा केली जाईल. तेव्हापासूनच भगवान विष्णू यांची पूजा तुळशी पूजेविना अपूर्ण मानली जाते.