जागतिक महासत्ता, सर्वात जुनी लोकशाही असा दबदबा असलेल्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या उग्र सत्तासंघर्षाने अवघे जग हादरले. पराभव मान्य न करणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट राजधानी वॉशिंग्टनच्या कॅपिटॉल हिलवर (संसदेवर) हल्ला चढविला.
बॅरिकेट्स तोडत घुसलेल्या माथेफिरूंनी दरवाजे, खिडक्या तोडल्या. तब्बल चार तास हा लाजिरवाणा हिंसाचार सुरू होता. ट्रम्पसमर्थक हल्लेखोर आणि पोलिसांमध्ये जणू ‘युद्ध’ झाले. यावेळी कॅपिटॉल हिलमधील खासदारांचा जीव वाचविण्यासाठी गोळीबार केला. यात एका महिलेसह चार हल्लेखोरांचा मृत्यू झाला असून किमान 52 जणांना अटक केली आहे.
यामुळे प्रगत राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये संचारबंदी लागू केली असून अमेरिकेत बंदोबस्त वाढविला आहे.
3 नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. मात्र ट्रम्प सातत्याने मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करीत आहेत. त्याचा भडका बुधवारी सायंकाळी 6 वाजता (अमेरिकेन वेळेप्रमाणे) उडाला आणि अवघे जग हादरले. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅपिटॉल हिलवर हल्ला झाला.
ट्विटर, फेसबुककडून ट्रम्प यांचे अकाऊंट ब्लॉक
डोनाल्ड ट्रम्प यांनी चिथावणीखोर भाषणाचा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर अपलोड केला होता. ट्विटर आणि फेसबुकने कठोर पाऊल उचलत ट्रम्प यांचे 2आठवडय़ांसाठी अकाऊंट ब्लॉक केले आहे. कटकारस्थान आणि हिंसाचार भडकविणाऱया मजकुरास आम्ही थारा देत नाही, असे ट्विटरने म्हटले आहे.
जगभरात चिंता; चीनला मात्र आनंद
अमेरिकेतील हिंसाचाराचे जगभरातील मीडियात प्रसारण झाले. अनेक देशांच्या प्रमुखांनी लोकशाही राष्ट्रात झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र चीनमध्ये आनंद व्यक्त होत आहे. चीन सरकारच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चे व्यंगचित्र छापून अमेरिका युनायटेट्स स्टेट आता कुठे राहिली, असा सवाल केला आहे.
अघटीत… अभूतपूर्व हिंसा
सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रम्प समर्थक कॅपिटॉल हिलबाहेर जमले. इलेक्ट्रोरल मते मोजू नका. ट्रम्पच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत अशा घोषणा हे समर्थक देत होते.
हजारोंच्या जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यात महिलाही मोठय़ा संख्येने होत्या. या वेळी पोलीस, सुरक्षारक्षकांबरोबर धुमश्चक्री झडली.
कॅपिटॉल हिलचे गेट तोडत जमाव आत घुसला आणि प्रचंड नासधूस सुरू केली. दरवाजे-खिडक्या तोडल्या. जमाव संसदेत घुसला. खुर्च्या, बाकं तोडली. सभापतींच्या खुर्चीवर टेबलावर ट्रम्प समर्थकांनी ठाण मांडले.
हिंसाचारामुळे खासदार भयभीत झाले. खुर्ची-टेबलाखाली त्यांनी आश्रय घेतला. पोलीस, सुरक्षारक्षकांनी खासदारांना संरक्षण दिले.
ट्रम्प समर्थकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या, गोळीबार केला. त्यात एका महिलेसह चार जण ठार झाले. या हिंसाचारात पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.
तब्बल चार तास हिंसाचार सुरू होता. ट्रम्प समर्थकांना हुसकावण्यात यश आल्यानंतर रात्री उशिरा संसदेचे कामकाज सुरू झाले. इलेक्टोरल मतांची मोजणी होऊन बायडन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदावर आणि कमला हॅरीस यांच्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब झाले.
ट्रम्प यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर हल्ला
अमेरिकन संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष पदी निवड झालेल्या नेत्याचा 20 जानेवारीला शपथविधी होतो. तत्पूर्वी 6 जानेवारीला इलेक्ट्रोरल कॉलेज मतांची मोजणी कॅपिटॉल हिलच्या हाऊस ऑफ काँग्रेसमध्ये (संसदेत) होते. या वेळी मावळते उपराष्ट्राध्यक्ष आणि सर्व खासदार हजर असतात.
राष्ट्राध्यक्ष पदासाठी 270 इलेक्ट्रोरल मतांची आवश्यकता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांना 306 तर ट्रम्प यांना 232 मते मिळाल्याचे नोव्हेंबरमध्येच स्पष्ट झाले. कॅपिटॉल हिल येथे पुन्हा या इलेक्ट्रोरल मतांची मोजणी होऊन नवीन राष्ट्राध्यक्षाच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाते.
मात्र ही संपूर्ण प्रक्रियाच उधळून टाकण्याचा कट डोनाल्ड ट्रम्प यांनी रचला. बुधवारी दुपारी व्हाईट हाऊसजवळ समर्थकांसमोर ट्रम्प यांनी 70 मिनिटे भाषण केले. कॅपिटॉल हिलवर मार्च काढा. मीच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार अशी चिथावणी त्यांनी दिली. त्यानंतरच ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार केला हे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. दरम्यान, प्रचंड हिंसाचारानंतर ट्रम्प यांनी सत्तांतर मान्य केले आहे.
हा देशद्रोह आहे : बायडन
कॅपिटॉल हिल इमारतीत जे झाले तो विरोध नाही, हा तर देशद्रोह आहे. कायद्याला न जुमानणाऱयांची संख्या खूप कमी आहे. पण ही अमेरिकेची संस्कृती नाही. लोकशाहीत विरोध होऊ शकतो; पण असा हिंसाचार मंजूर नाही. हा देशद्रोह असून तो थांबला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया बायडन यांनी दिली.
अखेर बायडन बनले अध्यक्ष
ट्रम्प समर्थकांनी अभूतपूर्व हिंसाचार केल्यानंतरही अमेरिकन सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हने इलेक्टोरल कॉलेज मतांची मोजणी करून त्याला मान्यता दिली. त्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांना 306 मते पडल्याचे शिक्कामोर्तब झाले. ट्रम्प यांना 232 मते मिळाली. त्यामुळे आता 20 जानेवारीला बायडन राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतील.
ट्रम्प यांची गच्छंती; हल्ला भोवणार
जो बायडन 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांची 20 जानेवारीपूर्वीच गच्छंती अटळ आहे. अमेरिकन संविधानातील 25व्या दुरुस्तीचा वापर करून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवले जाईल. तसेच हल्ला प्रकरणी ट्रम्प यांच्यावर फौजदारी कारवाई करून न्यायालयीन खटला चालवला जाण्याचीही शक्यता आहे.
अमेरिकेच्या लोकशाहीची मोदींना चिंता
वॉशिंग्टनमधील हिंसाचाराचे दृश्य पाहून खेद वाटतो. लोकशाहीसाठी ही चिंताजनक घटना आहे. सत्तांतर शांततापूर्ण मार्गाने व्हायला हवे. बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणे दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दरम्यान, अमेरिकेतील लोकशाहीची चिंता करणाऱया मोदींना दिल्लीच्या सीमेवर 43 दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे शेतकरी दिसत नाहीत का, शेतकऱयांचे दुःख दिसत नाही का, असा सवाल सोशल मीडियात विचारला जात आहे.