केसांची वेणी घातल्यामुळे केस लांबसडक आणि मजबूत होतात असं आई किंवा आजी वारंवार सांगतात, पण बहुतांश महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आपले केस लांब व्हावे यासाठी त्या वेगवेगळे प्रयोग करत राहतात. बाजारातून महागडी उत्पादने आणतात. महागडे शाम्पू, हेअर स्पा आणि कंडीशनर वापरतात. पण परिणाम शून्य… फक्त वेणी घातल्याने केस लांबच होत नाहीत, तर ते गळायचेही थांबतात.
———————
वेणी ठेवा बांधून…
नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, कायम केसांची वेणी घातल्यामुळे केस छान वाढतात. कारण केस खुले ठेवण्याऐवजी जर वेणी घालून बांधून ठेवले तर ते कमी तुटतात. ते ओढले गेले नाहीत तर त्यांची वाढही वेगाने होते. यामुळे लांबसडक केस हवे असतील तर ते मोकळे न सोडता त्यांची वेणी घालून ठेवा.
रात्री झोपण्यापूर्वी वेणी जरूर घाला
तुम्ही जेव्हा केस मोकळे सोडता तेव्हा ते खूप गुंततात आणि तुटायला लागतात. शिवाय मोकळे केस धूळ, घाण आणि मातीच्या संपर्कात जास्त येतात. यामुळे तुमचे केस रूक्ष आणि निर्जीव होतात. म्हणून झोपण्यापूर्वी केसांची वेणी घालून मग झोपाल तर केस जास्त ताणले जाणार नाहीत.
हेही करून पाहा…
– केस लांब करण्यासाठी सर्वप्रथम तुमची लाईफस्टाईल आणि आहार सुधारा.
– केसांची वाढ जेनेटीक आणि पोषक घटकांवर अवलंबून असते.
– हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारून आणि जास्त प्रमाणात पोषक द्रव्ये घेतल्याने केस मजबूत होतील.
– आठवड्यातून किमान एकदा केसांना तेल लावून मसाज जरूर करा. यामुळे केसांना पोषण मिळते.
– किमान 8 तासांची शांत झोपही केसांच्या विकासासाठी खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे केस हेल्दी आणि लांबसडक होतात.