कोरोनावरील लस दृष्टिपथात आली असल्याने जगभरातून काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून कोरोना नावाच्या अकल्पित घटनेने संपूर्ण जग वेठीस धरल्यासारखे झाले होते. म्हणूनच, लसीच्या माध्यमातून कोरोनाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता तरी किमान क्षितिजावर दिसू लागल्याची भावना दिलासादायी आहे.
कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांबरोबरच व्यक्तिगत खबरदारी अतिशय महत्वाची आहे. या संदर्भात अनेकविध माध्यमांमधून अनेकविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. धार्मिक सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी खूपच संयम बाळगला. पण, काही प्रसंगी हा संयम सुटला. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या माध्यमातून हा संयम सुटला. बाजारपेठा बहरल्या. व्यापारी सुखावला. पण, प्रत्यक्षात मात्र कोरोना फोफावला. कित्येक महिने घरातच लॉकडाऊन अवस्थेत काढल्यानंतर दिवाळी सुट्यांच्या निमित्ताने पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली. कोरोनाचे आयतेच फावले.
या दिवाळी धमाक्याचा नको तो (अर्थात अपेक्षित असाच) दुष्परिणाम झाला, होतो आहे. देशभरात कोरोना संसर्गाची दुसरी (काही ठिकाणी तिसरी) लाट येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संसर्ग रोखण्यासाठी आता नाकेबंदी करण्यात आली आहे. गुजरात, दिल्ली, गोवा आणि तामिळनाडू आदी राज्यांमधून प्रवास करीत असलेल्यांची विमानतळ, रेल्वे-बस स्थानके, इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सीमांवर नाकेबंदी करण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये जरादेखील लक्षणे आढळली, तर प्राथमिक चाचणी करून त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये काही पॉझिटिव्ह केसेस आढळल्याने या उपाययोजनांची परिणामकारकता स्पष्ट झाली आहे. तसेच, कोणत्याही प्रवासी व्यक्तीमुळे राज्यात कोरोना संसर्गाची नव्याने लागण होणार नाही, याचीदेखील खातरजमा बाळगणे शक्य होत आहे.
कोरोनाची पहिली केस पुण्यामध्ये ९ मार्च रोजी उघड झाली. त्यानंतर आम्ही पुण्याच्या प्रशासनाला त्या संदर्भात सूचना केल्या होत्या. पुण्यात येत असलेल्या सहाही महामार्गांवर टोल नाके आहेत. त्या ठिकाणी अशाच प्रकारची नाकेबंदी केली, तर पुण्यात कोरोनाचा फैलाव होणार नाही, असे त्यांना सूचविले होते. तेव्हा अशा सूचनांकडे फारसे गांभीर्याने पाहिली गेले नव्हते. किंबहुना, संसर्गाची व्याप्ती किती मोठी आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी केवढी महाकाय फौज लागणार आहे, त्यासाठी किती जागरूकता करावी लागेल, याचा काहीच अंदाज नव्हता. त्यामुळेच, अशा सूचना अंमलबजावणीपर्यंत पोचू शकल्या नाहीत.
आता मात्र, कोरोनाची पूर्णपणे नाकेबंदी करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य म्हणजे प्रशासन सज्ज आहे.
कोरोनाची दुसरी-तिसरी लाट येण्याच्या भीतीनंतर आता पुन्हा चर्चा होऊ लागली आहे ती लॉकडाऊनची. पाश्चिमात्य देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. त्याच धर्तीवर आपल्याकडेही लॉकडाऊन केला जाईल, अशा भीतीने नागरिक धास्तावले आहेत. व्यापारी वर्गामध्ये पुन्हा एकदा मोठी घबराट पसरली आहे. मोठ्या हिमतीने उभे केलेले व्यवसाय पुन्हा ल़ॉकडाऊनच्या गर्तेत अडकणार की काय, या विचाराने त्यांची झोप उडाली आहे.
प्रत्यक्षात, कोरोना संसर्गाच्या आकडेवारीला उतरती कळा लागली आहे. मुंबई-पुणे-नाशिक या पूर्वीच्या हॉटस्पॉटमध्ये रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढेच आहे. तर, मृत्युदरातही मोठी घट झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या पेशंटच्या संख्येतही घट होत आहे. तसेच, सर्वांच महत्वाचे म्हणजे व्हेंटिलेटरवर आणि अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांची संख्या २० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळेच, सामूहिक संसर्ग पातळी (हर्ड इम्युनिटी) गाठली गेली असेल, असे म्हणा हव तरं, किंवा माझे कुटुंब माझी जबाबदारीसारखी मोहीम असेल की सरकार-प्रशासनाचे प्रयत्न आणि त्याला नागरिकांनी दिलेली साथ, यामुळे म्हणा हवं तर, कोरोना संसर्ग उतरणीला लागला आहे, हे वास्तव आहे.
कोरोनाचे आकडे हे गगनभेदी होण्यास काही दिवसांचाच अवधी पुरेसा आहे. त्यामुळेच, हुरळून जाण्याचे वा बेफिकीर होण्याचे काहीच कारण नाही. तसा आत्मघातकीपणा आपण करणार नाही, अशी आशा आहे. त्याचप्रमाणे, आता तरी शासन-प्रशासनाच्या आदेशाला कोणतीही अरेरावी न करता सहकार्य करण्यासाठी सामाजिक सामंजस्याची भूमिका सर्वांनी घेणे गरजेचे आहे. राजकीय पक्ष, मुख्य म्हणजे विरोधक हेदेखील समाजाचा एक घटकच आहेत. त्यामुळेच, त्यांनीदेखील संयमाने आणि सामंजस्याने वागण्याची गरज आहे. कोणत्याही पद्धतीने कोरोनाचा मुकाबला करताना समाजात कोणत्याही कारणास्तव दुफळी माजणार नाही, सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेबद्दल अविश्वास दाखवला जाणार नाही, याची खातरजमा सर्व घटकांनी बाळगणे गरजेचे आहे.
बाकी कोरोना संसर्गाची नाकेबंदी चोखपणे केली जात आहे. लसनिर्मितीचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन वर्षाची पहाट कोरोना संसर्गावर मात करण्याच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ शुभेच्छा संदेशानेच उगवेल, यात शंका नाही. पण, त्यासाठी सध्या तरी कोरोनाच्या या नाकेबंदीला पूर्णपणे सर्व शक्तिनिशी साथ देण्याचे कर्तव्य प्रत्येक नागरिक आणि समाजातील प्रत्येक घटकाने पार पाडणे अत्यावश्यक आहे.