“अहो, काय सांगता? तुम्ही एवढी खबरदारी घेऊनही तुमचा कर्व्ह अजून फ्लॅट कसा नाही झाला? आम्ही बुवा खूपच काळजी घेत आहोत. गरम पाणी, व्हिटॅमिन, होमिओपॅथी, काढा आणि सॅनेटायझरचा तर मारा करतो आहोत. आमचा स्प्रेड आता फक्त सिंगल डिजिटपर्यंत कमी झाला आहे आणि डबलिंग रेटदेखील १०० दिवसांपुढे गेला आहे. तुम्ही काळजी घ्या हो. को-मॉर्बिड आहात ना…”
पूर्वी आपल्याकडे कुणी भेटले, की हवापाण्याच्या गप्पा मारण्याची पद्धत होती. गावाकडे पीकपाण्यावर चर्चा होत असे. आता मात्र ‘न्यू नॉर्मल’मध्ये असा काही संवाद होत आहे! साहजिकच आहे. कोरोना नावाच्या जागतिक अवस्थेमुळे आपले सारे विश्वच बदलून गेले आहे. लोकं त्याला महामारी वगैरे संबोधून समोरच्याला पूर्ण खच्ची करून टाकतात. मी मात्र त्याला नवीन युग असेल म्हणणे पसंत करीन. ते नाही का आपण इतिहास भूगोलाच्या पुस्तकांमध्ये शिकलो होतो, ते अश्मायुगीन, मध्ययुगीन आणि आधुनिक वगैरे. तसेच, आता कोरोनायुगीन! यापूर्वी एकविसाव्या शतकामध्ये प्रवेशताना आपण मिलेनियम बेबी ही संकल्पना ऐकली होती. आता कोरोना बेबी, कोरोना पासआऊट वगैरे शिक्के तयार होऊ लागले आहेत. म्हणूनच, केवळ आपले शहर, राज्य, देशच नव्हे, तर अखिल विश्वाला आपल्या विळख्यात घेतलेल्या कोरोनाला एक युग असेच संबोधिणे अधिक वास्तववादी ठरणार नाही का!
असो…
दीपावलीच्या निमित्ताने आपण एकमेकांना शुभेच्छा देत आहोत. आतिषबाजीला फाटा देत मर्यादित स्वरूपात फटाके उडवून आपण लक्ष्मीपूजनदेखील साजरे केले. दिवाळी शॉपिंगदेखील आपण बॅलन्सशिटवर करडी नजर ठेवूनच केली. केवळ आर्थिकच नव्हे, तर आपल्या जीवनशैलीचा प्राधान्यक्रमदेखील बदलला. आणि त्यामधून आपण नवी आशा, नवी दिशा आणि नवीन प्रेरणेचा शोध घेत एकमेकांना नवीन संवत्सराच्या शुभेच्छा देत आहोत.
मात्र, कोरोनायुगाचा अस्त करून या नवीन पर्वामध्ये आपण जाणार तरी कसे? कोरोनावर विजय मिळविणारी लसवगैरे होईलच. पण, त्याहीपेक्षा महत्वाची ठरणार आहे ती संयम, संवाद आणि सहवेदना ही ‘स’ सूत्री!
हातामधील त्या रिमोटच्या जादूने (आता जॉय स्टिक म्हणायला हवे!) आपण दोन-तीनशे चॅलेन्सचा अगदी काही मिनिटांमध्ये फडशा पाडतो. जेट स्पीडमध्ये हातामधील मोबाईलच्या माध्यमातून अखिल विश्वास ई-भ्रमंती करून येतो. हे सारे तुफानच आहे. पण, त्यामुळे आपण संयम नावाची गोष्ट इतिहासजमा करून बसलो आहोत. आज, आत्ता एका क्लिकवर - करलो दुनिया मुठ्ठी में! कोरोनायुगाचा अस्त करण्यासाठी आणि सध्या आलेल्या ‘न्यू नॉर्मल’मध्ये सुकर आयुष्य जगण्यासाठी आपल्याला संयम नावाच्या औषधाची अत्यंतिक गरज आहे.
शून्यातून विश्व उभारण्यासाठी कोणत्या मोबाईलवरून ऑर्डर प्लेस करता येत नाही. ते आपल्यास चिकाटी आणि मेहनतीने घडवावे लागते. त्यासाठीच आवश्यक आहे संयम.
कोरोनाचे एक बरे आहे, ही अवस्था अखिल विश्वाची आहे. त्यामुळेच, संपूर्ण विश्वच या कोरोनायुगाच्या अस्तासाठी एकवटले आहे. त्यामुळेच, कोणा एकाच्या प्रयत्नांवर नव्हे, तर सहकार्याच्या जोरावर ही लढाई जिंकणे शक्य होणार आहे. त्यासाठी गरजेचा आहे तो संवाद! सर्व भेदाभेद दूर लोटत सर्वंच स्तरांवरील संवाद गरजेचा आहे. काय करावे, काय करू नये, एखाद्या परिस्थितीला कसे सामोरे जावे, अशा छोट्या गोष्टींपासून ध्येय-धोरणे यशस्वीपणे राबविण्यापर्यंतचा प्रवास हा विनासायस साध्य करता येईल, ते या संवादाच्याच पुलामुळे.
आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सहवेदना. आपण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहोत. किंवा, कोणाला बरे नसेल, तर गेट वेल सून, असे म्हणत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, आता त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन त्याची सहवेदना अनुभविणे वा त्याबाबत जाणिवांच्या माध्यमातून विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच, ती केवळ तोंडदेखली, रूक्ष मेसेजपुरती मर्यादित राहणार नाही, तर संबंधित व्यक्ती वा समूहाला त्या वेदनेपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या कृतिशील पुढाकाराचा श्रीगणेशा ठरेल.
… बरं, या ‘स’ सूत्री कोणत्याही व्हॅक्सिन स्वरूपात रेडिमेड उपलब्ध होणार नाहीत. त्या आपल्याला एकमेकांच्या सहकार्यानेच अंगीकारणे गरजेचे आहे. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ… तसेच एकमेकांच्या मदतीच्या जोरावरच हे ‘स’कार (स‘र’कार सुद्धा!) यशस्वीपणे राबवून आपण नवीन संवत्सरामध्ये यश-कीर्ती, धन-धान्य आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी भरारी घेऊ शकणार आहोत.
बोला, तयारी आहे का तुमची या ‘न्यू नॉर्मल’चा स्वीकार करण्याची? केवळ, व्यावहारिक, दृश्य स्वरूपातील बदल नव्हे, तर आपल्या अंतर्भूत आचार-विचार आणि व्यक्तिमत्वामध्ये हे बदल अंगीकारण्याची?
आणि ती तयारी असणारच, नाही आहेच, असा माझा ठाम विश्वास आहे. नाही तर गेल्या सहा महिन्यांमध्ये असंख्य प्रकारच्या विपरित परिस्थितींवर मात करून आपण इथवर मजल मारलीच नसती!
एक समाज म्हणून एकमेकांना भक्कमपणे पाठबळ देत कोरोनायुगाचा अस्त क्षितिजावर येऊ घातलेल्या घटकेपर्यंतचा प्रवास आपण साध्य केलाच नसता. आपल्याकडे कदाचित लौकिकार्थाची साधनसामग्री नसेलही. पण, या तीन ‘स’कारांच्या पलिकडे जाणारे एक सत्व आपल्याकडे आहे. ते म्हणजे, आणखी एक स… संस्कार! तोदेखील या कोरोनायुगात पुन्हा अधोरेखित झाला आहे.
दीपावलीच्या निमित्ताने नवीन युगाचे स्वागत करताना आणखी एक ‘स‘ आत्मसात करू… तो म्हणजे सकारात्मकता. आणि झेपावू नवीन संवत्वराकडे. नवीन आशा, नवीन दिशा आणि नवीन प्रेरणा घेत!