१६ ऑक्टोबर १९२१ या तारखेला प्रबोधन पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. केशव सीताराम ठाकरे हे यानंतर प्रबोधनकार ठाकरे या नावाने आयुष्यभर ओळखले गेले. ही ओळख त्यांना देणार्या आणि महाराष्ट्रात परखड प्रबोधनयुग आणणार्या या पाक्षिकाचे हे शताब्दी वर्षानिमित्ताने प्रबोधनकारांच्या आजही मौलिक असलेल्या विचारांचा जागर मांडणारे हे साप्ताहिक सदर.
`चित्राला जसा पार्श्वभाग, तसा व्यक्तीच्या चरित्राला पूर्वजांचा इतिहास. तो कळल्याशिवाय त्या व्यक्तीच्या चरित्राचा नि चारित्र्याचा नीट अंदाज लागत नाही. आधुनिक शास्त्रज्ञांनी आनुवांशिक संस्कारांची अव्यवहार्यता कितीही सिद्ध केलेली असली, तरी माझा अनुभव तिचे महत्त्व नि आवश्यकताच सिद्ध करीत आहे.’ – प्रबोधनकार ठाकरे, `माझी जीवनगाथा’
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं, `आमचं ठाकरे घराणं सेवाव्रती आहे. महाराष्ट्राची सेवा करणारी आजची ही आमची सहावी पिढी आहे, आदित्यची पिढी बघितली तर. आणि त्या पिढीवर एक संस्कार आहे.’
मुख्यमंत्र्यांनी आज नोंदवलेला ठाकरे घराण्याच्या सेवेचा वारसा आहे तो अर्थातच प्रबोधनकार ठाकरेंमुळे. त्यांनी त्याचा सविस्तर गोष्टीवेल्हाळ इतिहासच सांगितलाय.
प्रबोधनकारांच्या आत्मचरित्राचा एक मोठा भाग त्याने व्यापलेला आहे. आणि त्या इतिहासाची सुरवात होते, ठाकरे हे धोडपकर असण्यापासून. हो धोडपकरच. ठाकरेंचे पूर्वज या नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्याचे किल्लेदार होते, म्हणून धोडपकर. नाशिकमधले गिर्यारोहक सुदर्शन कुलथे या किल्ल्याविषयी माहिती सांगतात, `मुंबई आग्रा हायवेवर चांदवडच्या दिशेने वडाई भोई नावाचं गावं लागतं. तिथून १०-१५ किलोमीटवर आत हत्ती-परदेशीवाडी हे गाव लागतं. तिथून वर हा धोडप किल्ला आहे. हा सह्याद्रीतला पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला. डोंगरांमधे सुळक्यांच्या रचनेला प्लग म्हणतात आणि अरुंद भिंतीसारख्या रचनेला डाईक म्हणतात. या दोन्ही गोष्टी असलेला धोडप हा एकमेव किल्ला आहे. त्याची डाईक सह्याद्रीत सर्वात मोठी आहे. आजच्या नाशिक जिल्ह्याचा नकाशा बघितला. तर त्याच्या बरोबर केंद्रस्थानी हा किल्ला आहे. शिवाय सापुतारापासून मनमाडपर्यंत पसरलेल्या सातमाळा पर्वतरांगेच्याही बरोबर मध्यभागी हा किल्ला आहे.’
आज धोडपच्या किल्लेदारांचे वंशजही महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलेत. किल्ल्याविषयी कुलथे पुढे सांगतात, `थोरले माधवराव पेशवे यांचं काका राघोबादादांबरोबरचं युद्ध इथेच झालं होतं. राघोबा याच किल्ल्याच्या आश्रयाला होते. तरीही माधवराव जिंकले. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. इतक्या वर्षांनंतरही हा किल्ला पाहण्यासारखा आहे. निसर्गसौंदर्य तर आहेच. पण नक्षीकाम केलेले दरवाजे, तटबंदीची बर्यापैकी सलग मालिका, जुन्या इमारतींचे अवशेष, पाण्याची टाकी, पेशवेकालीन बारव, देऊळ, आश्रम अशा गोष्टी आहेत. औरंगजेबाचा सरदार अलीवर्दीखान याचे तीन फारशी शिलालेख आहेत. गडावर आजही सोनारवाडी नावाची वस्तीही आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी याच किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या हत्ती गावचे. त्यांनी या परिसरात पर्यटन विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणला होता. तो आता बारगळल्यात जमा आहे.’
इंग्रजांकडे जाईपर्यंत ठाकरे घराण्याने हा किल्ला स्वराज्यासाठी प्राणपणाने जपला. त्यानंतर ते त्यांचं मूळ गाव पाली इथे परतले. हे पाली म्हणजे रायगड जिल्ह्यातलं अष्टविनायकातल्या बल्लाळेश्वराचंच गाव. याच गावात ठाकरे घराण्याच्या सेवेचा श्रीगणेशा दिसतो.
तो करणारे होते, कृष्णाजी माधव धोडपकर उर्फ आप्पा. गावातल्या मोठ्या इस्टेटीचे सर्वात थोरले वारसदार. त्यांच्या भावंडांना इस्टेटीत वाटे हवे झाले. आप्पांना ते मान्य नव्हतं. एक दिवस त्यांनी सगळ्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना बोलावून सगळ्यांसमोर कागदावर सह्या करून वडिलोपार्जित इस्टेटीवरचा हक्क सोडून दिला. शपथ घेतली, `मी आणि माझ्या स्वतःच्या वंशीचा कोणीही या पालीच्या इस्टेटीत हक्क सांगायला येणार नाही. येईल तो माझ्या रेताचा नाही. `त्याच क्षणी त्यांनी बायको आणि तीन मुलांसह फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी पाली सोडलं.
तिथून ठाण्यात येऊन त्यांनी वकिली सुरू केली. पण ती केवळ सत्याच्या बाजूने लढण्यासाठी आणि पिचलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्यामुळे त्यांची मिळकत कमी होती. पैसे मिळायचे तीही गरजवंतांना मदत करण्यात खर्च व्हायचे. त्यांचे थोरले चिरंजीव रामचंद हे प्रबोधनकारांचे आजोबा. देवीच्या भिकेने झाले म्हणून मिळालेलं भिकोबा हेच टोपण नाव त्यांनी चालवलं. मराठी सहावी शिकून ते कोर्टात नोकरीला लागले. पुढे ठाण्याहून बदली होऊन पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात आले. पनवेलच्या प्रभूआळीत घर बांधून शेवटपर्यंत तिथेच राहिले.
भिकोबांना सगळे तात्या म्हणायचे. ते मूळ वारकरी. बावीस वेळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केलेली. खंजिरीवर भजनही गायचे. पण उत्तर आयुष्यात त्यांचा ओढा देवीच्या उपासनेकडे वाढत गेला. त्यामुळे नवरात्रीला त्यांच्या अंगात संचार व्हायचा. अंगात आलेलं असताना ते चमत्कार करत, अशी वर्णनं प्रबोधनकारांनी केली आहेत. आज त्याचा अर्थ लावायचा झाला तर इतकाच लावता येईल की आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या आणि श्रद्धेच्या जोरावर तात्या त्यांच्या सहवासात येणार्यांना आत्मविश्वास मिळवून देत. आपली प्रामाणिकपणाची पुण्याई पणाला लावून गरजूंना आधार देत. त्यामुळे त्यांना मानणारे भक्त परिसरात मोठ्या संख्येने होते. पण त्याचा गैरफायदा घेत त्यांनी बुवाबाजी, स्वार्थ, लूट किंवा शोषण केलं नाही. उलट ते अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले.
प्लेग आलेला असताना एक प्लेगदेवी उग्र वेषभूषा करून, रेड्यावर बसून गावोगाव खंडणी मागत फिरत असे. ती पनवेलला आली तेव्हा तात्यांनीच तिचं ढोंग उघड केलं.
तात्या काशीला गेलेले असताना एका पंड्याने सांगितलं की मागतो तेवढी दक्षिणा देत नसाल तर मंत्र म्हणणार नाही. त्यामुळे तुमचे पूर्वज नरकात जातील. त्यावर तात्यांनी रूद्रावतार धारण केला. खड्ड्यात गेलं ते श्राद्ध म्हणत त्याला फटकारलं, `आमच्या पूर्वजांच्या स्वर्ग नरकाच्या किल्ल्या तुझ्या हातात आहेत का?’ तात्यांमुळे बाकीचे यात्रेकरूही उठले. मग पंड्याने तात्यांसमोर लोटांगणं घातली.
प्रबोधनकारांच्या दुसरे आजोबा म्हणजे आईचे वडील वामनराव उर्फ बाबा पत्की हेपण पनवेलचेच. ते यशस्वी वकील होते. दरवर्षी ते ठाणे आणि कुलाबा जिल्ह्यातल्या शेकडो भिकार्यांना अन्न आणि कपडे दान करत. शिवाय पनवेलमधली महादेवाच्या देवळांत त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या. आज हार्बर लोकल रेल्वे लाईनवरच्या स्टेशनच्या नावामुळे लोकांना माहीत झालेलं खांदेश्वर हे देवस्थानही त्यांच्याच प्रयत्नातून उभारण्यात आलं.
एका आजोबांची शक्त्युपासना आणि दुसर्या आजोबांची शिवोपासना यांचा आपल्या चरित्र आणि चारित्र्यावर मोठा परिणाम झाल्याचं प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवलंय. शिवसेनाप्रमुखही सांगत की आपल्या घरण्यातल्या दैवी पुरुषांच्या आशीर्वादामुळे ठाकरे घराण्याची नेहमी भरभराटच होणार आहे. उद्धव आणि आदित्य या ठाकरेंच्या आजच्या पिढ्यांना लाभलेला कृष्णाजी, भिकोबा, सीताराम, केशव, बाळासाहेब असा वारसा श्रद्धेचा आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त सेवेचा आहे. महाराष्ट्रसेवेचा आहे.