दोन परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तिरेखांमध्ये निर्माण होणार्या एका प्रेमकथेचे चित्रण सादर करणारी ‘तेरी मेरी इक जिंदरी’ ही नवी मालिका 27 जानेवारीपासून झी टीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेत मराठमोळा आध्विक महाजन जोगिंदर नावाच्या नायकाच्या भूमिकेत चमकणार आहे, तर नवोदीत अभिनेत्री अमनदीप सिद्धू यात माही नावाची नायिकेची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेचे कथानक अमृतसर शहरात घडते. ही माही आणि जोगी या दोन तरुणांची कथा असून त्यांचे स्वभाव, जीवनविषयक दृष्टिकोन आणि सामाजिक पार्श्वभूमीही अगदी भिन्न असते. माही ही 21 वर्षांची पंजाबी मध्यमवर्गीय तरुणी आपल्या छंदालाच व्यवसाय बनवत अमृतसरमधील पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर बनते. माहीच्या या स्वभावाच्या अगदी उलट जोगिंदर ऊर्फ जोगीचा दृष्टिकोन आहे. माणूस पैशाने नाही, आनंद मानण्यामुळे श्रीमंत होतो असे त्याचे मत आहे. आध्विक आपल्या भूमिकेबाबत म्हणतो, मी आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा जोगीची व्यक्तिरेखा वेगळी आहे. तो एक उत्साही आणि रंगेल पंजाबी तरूण तर आहेच, पण त्याची स्वप्नेही भव्य नसतात. आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो आनंद शोधतो. अशा दोन परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा ही प्रेमकथा कसे वळण घेते, ते या मालिकेत पाहायला मिळणार आहे.