दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहरातील (दि.11) शिव मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय सर्व मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी घरीच पूजाअर्चा करावी. मंदिरात दर्शनाकरिता येऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त (गुरुवारी दि. 11 ) मंदिरात भाविकांची गर्दी होऊ शकते. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या महादेव मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक घेऊन गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मंदिर विश्वस्तांनीदेखील आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंदिर बंद ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.
त्यामुळे महाशिवरात्रीला भाविकांनी घरातच पूजाअर्चा करण्याचे आवाहन पोलिसांसोबतच मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे. पाताळेश्वर लेणी, ओंकारेश्वर मंदिर, श्री तारकेश्वर मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, अरण्येश्वर, वाघेश्वर या महादेव मंदिरात महाशिवारात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मंदिराबाहेर दर्शिनार्थींची आणि विक्रेत्यांची रांग असते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी मंदिर विश्वस्थांची बैठक घेऊन मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना