जिओ स्टुडिओज आणि दृष्यम फिल्म्स या दोन बॅनर्सने आज आपल्या ‘रामप्रसाद की तेरहवी’ या नव्या चित्रपटाचे ट्रेलर सोशल माध्यमावर रिलीज केले. तेराव्याचाही कसा सोहळा होऊ शकतो असा मजेदार विषय घेत या सिनेमात ब्लॅक कॉमेडी करण्यात आली आहे. सीमा पाहवा यांचा हा सिनेमा 1 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. घरातले सर्वात मोठे बाऊजी रामप्रसाद भार्गव यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे मोठे कुटुंब एकत्र येते. हे सगळेजण 13 दिवस एकत्रच राहातात. पण बाऊजींचा मृत्यू राहातो बाजूला आणि हे सगळेजण एकत्र आल्याचा आनंद धमाल साजरा करण्यात गुंग होतात. या मजेदार सिनेमात नसिरुद्दीन शाह यांनी बाऊजींची भूमिका केली आहे, तर यातल्या अन्य भूमिकांमध्ये सुप्रिया पाठक, कोंकणा सेन-शर्मा, परांब्रता चटर्जी, विनय पाठक, विक्रांत मेसी आणि मनोज पाहवा हेही दिसणार आहेत.
या सिनेमाद्वारे टीव्ही अभिनेत्री सीमा पाहवा प्रथमच दिग्दर्शनात उतरली आहे. या सिनेमाबाबत ती म्हणते, मी दिग्दर्शन केलेला माझा पहिलाच सिनेमा नववर्षात प्रदर्शित होतोय याचा मला खूपच आनंद होतोय. माझ्या स्वत:च्या अनुभवावर मी हा सिनेमा बनवला आहे. माझे वडील बऱ्याच वर्षांपूर्वी गेले. त्यावेळी आम्ही सर्वजण असेच एकत्र जमलो होतो. तेव्हापासून हे कथानक माझ्या डोक्यात होते. आता ते सत्यात उतरले आहे, असेही तिने स्पष्ट केले.