तुमची ट्रोलधाड महाराष्ट्रातल्या साधुंसमोर उत्तर प्रदेशातल्या साधूंच्या हत्येला बेमालूम झाकून टाकू शकते. लोकं नोकर्या गमावतायत, दुकानं बंद होतायत, उद्योगांना टाळी लागतायत, पण तुमच्या सैन्याच्या जोरावर या सगळ्यांचा विसर पडू शकतो. अहो चिनी सेना आपल्या भूमीत आली, तरी तुम्ही एकहाती तिला (इंटरनेटवरून!) गायब करून टाकू शकता, एवढी जबरदस्त ताकद आहे, तुमच्या बोटात!
माननीय अमितजी,
ट्विटरने आपल्या पोस्टवर काहीतरी टीकात्मक शेरेबाजी केल्याचं ऐकून आम्हाला अतिशय आनंद झाला. नाही म्हणजे काय आहे–आपल्या भारतीय माणसाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली, (मग ती कशी का असेना), की आम्हाला आनंदच होतो! अहो त्या चार्ल्स शोभराजवर खुनाबिनाचे आरोप होते, तरी पठ्ठ्या फ्रान्सपर्यंत जाऊन गाजला होता. त्यावर पण आम्ही तसे मनातून खूश झालेलो होतो. इथे तर तुम्ही फक्त खोटारडेपणा केला म्हणून पकडले गेलायत. आणि त्यामुळे साक्षात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पंक्तीत जाऊन बसलायत! शेवटी काय आहे, आम्हाला तुमचा मूलमंत्र माहित्ये, ‘कोणतीही पब्लिसिटी ही चांगलीच असते! बदनाम हुए, पर नाम तो हुआ?’ नाही का? पण या आनंदात पत्र लिहायला घेतल्यावर आम्हाला थोडी भीतीपण वाटत्ये. तुमची सोशल मीडियाची ताकद इतकी जबरदस्त आहे, की तुम्हाला राग आला तर आमची काही खैरियत नाही. तुम्ही आमच्याकडे बोट दाखवले तर, आमच्यावर चारी बाजूने तुमची ट्रोलधाड तुटून पडेल. आमच्या मुलाबाळांपासून ते पूर्वजांपर्यंत सगळ्यांची उणीदुणी निघतील. असल्या-नसलेल्या आमच्या सगळ्या क्लिपा नव्याने एडिट होतील आणि पंधरा दिवसांत बाकी सगळे सोडा, पण आम्हालाही पटायला लागेल, की आम्ही बलात्कारी आहोत, आमचे पूर्वज मुिस्लम होते आणि सगळं कुटुंब देशद्रोही तर आहेच…! तेव्हा पत्रावर नाराज होऊ नका. आदरणीय सर्वोच्च न्यायालय म्हणतं, तसं वाचू नका पाहिजे तर…
पण खरं सांगू का? या जगाला तुमची कदरच नाहीये! अहो राहुल गांधींची क्लिप तुम्ही थोडीबहुत एडिट केली, तर कुठे बिघडलं? हे काय तुम्ही पहिल्यांदा थोडीच केलंय? मागे नाही का, बटाट्याचं सोनं करू, असं ते म्हणाल्याची क्लिप तुम्ही एकदम यशस्वीपणे फिरवली होती. डेरा सच्चाच्या रामरहीमबरोबर तुमच्या पक्षाचे संबंध असल्याचं लोकं सांगायला लागले आणि तुम्ही लगेच राहुलच्या माथी ते पाप मारलं. तसे तुम्ही कुणालाच सोडत नाहीत. मग तुम्ही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर चाललेली निदर्शनं, केजरीवालांच्या घरासमोर दाखवली. रविश कुमारांची क्लिप हवी तशी एडिट करून दहा सेकंदात त्यांचीही बदनामी केली. थोडक्यात काय, मुळातले वास्तवातलं चित्र/व्हीडिओ हे महत्त्वाचं नाही.
आपल्याला जे म्हणायचं आहे, ते दाखवायला आपण ती कशी वापरतो, हे महत्त्वाचं, हा तुमच्या कामाचा मूलमंत्रच आहे. आणि तुमच्या कोणत्यातरी कार्यकर्तीने गुजरात दंगलीचं चित्र बंगालच्या दंगलीचं म्हणून सांगितलं, तेव्हा हे सत्य तुम्ही निर्भयपणे मांडलेलंही होतं. किंबहुना तुमच्या दृकश्राव्य क्षेत्रातल्या या अतुलनीय कामासाठी उत्तम एडिटिंगचं एखादं ऑस्करही तुम्हाला द्यायला पाहिजे, तर हे फिरंग उलटे शेरे देतात! त्यांना ठावूकच नाही हो, या देशात ‘पर्सनल लिबर्टी’ सर्वांना समान आहे आणि काहींना जरा जास्तच समान आहे…
अमितजी, खरं तर तुमच्या पक्षात सोशल माध्यमांवरून कोणाबद्दलही, अक्षरशः काहीही लिहिणार्यांची काही कमी नाही. मुख्य म्हणजे त्यांच्या या कर्तृत्वाला तिथे मान आहे. त्यांना ‘योद्धे’ या सन्मानाने पुकारलं जातं आणि तुम्ही साक्षात या अजेय सेनेचे सरसेनापती…! आमचं काय म्हणणं आहे, तुमच्या या सैन्याला आदरणीय मोदीजींनी परवानगी दिली तर तेहरान/बगदादपासून जावा-सुमात्रापर्यंत अखंड भारत झाल्याशिवाय राहणार नाही!
उगीच तुमच्याच पक्षातले सुब्रम्हण्यम स्वामी नाहीतर भाजयुमोतले लोक्स तुमचे पाय ओढतात. अन्यथा जे करता आलेलं नाही आहे, ते आहे म्हणून लाखोंना पटवून देणं आणि जे आहे ते सत्तर वर्षांपासून कधी नव्हतंच, हे ठसवून सांगणं, ही काय सोप्पी गोष्ट आहे? पण तुम्हाला ती जोरदार जमते.
आणि हे करायला फक्त तुम्ही आणि तुमचे योद्धेच नाहीत… यंत्रतंत्राचा आधार घेऊन तुम्ही हजारो बॉट्स म्हणजे मानव-विरहीत अकौंट निर्माण करता, त्यांच्याकडून लाखो ट्विट/पोस्ट्स करवून घेता. मग ‘अगा जे घडलेची नाही’, अशा पार्ट्यांचे किस्से बनतात. धडाडीच्या, उदयोन्मुख नेत्यावर चिखलफेक होऊ शकते. निरपराध अभिनेत्रींना तुरुंगवास पण घडू शकतो. तुमची ट्रोलधाड महाराष्ट्रातल्या साधुंसमोर उत्तर प्रदेशातल्या साधूंच्या हत्येला बेमालूम झाकून टाकू शकते. लोकं नोकर्या गमावतायत, दुकानं बंद होतायत, उद्योगांना टाळी लागतायत, पण तुमच्या सैन्याच्या जोरावर या सगळ्यांचा विसर पडू शकतो. अहो चिनी सेना आपल्या भूमीत आली, तरी तुम्ही एकहाती तिला (इंटरनेटवरून!) गायब करून टाकू शकता, एवढी जबरदस्त ताकद आहे, तुमच्या बोटात!
आमची काय विनंती आहे फक्त… की त्या आमच्या बिचार्या पोलिसांना सोडा हो! नाही म्हणजे काय, तुम्ही हवा तापवल्यावर उगा त्यांचं काम वाढतं. बिनमहत्त्वाच्या विषयांवर चौकशी करण्यात वेळ घालवायला लागतो. समाजात ताण वाढला, तर बंदोबस्ताच्या ड्युट्या लागतात. सायबर सेलला तर फुकाचं दिवसरात्र राबावं लागतं. आणि काय आहे, मुंबई/महाराष्ट्र पोलीस लय भारी आहेत. ते तुमचे बॉट्स शोधून काढतात. तुमच्या योध्ध्यांच्या गचांड्या धरून खोटारडेपणाबद्दल त्यांना माफी मागायला लावतात. तुमच्या सगळ्या प्रभावी अस्त्रांना लोकांसमोर उघडं करतात. त्यांचं तसं ते चुकतंच म्हणा! अहो, हा तर त्यांचा राजकीय सूड झाला. त्यांना कळत नाही, खोटीनाटी पोस्ट, दिशाभूल करणारा प्रचार आणि घाऊक बदनामी, याला खरंतर देशभक्ती म्हणतात, ते जीडीपी-बीडीपी सब झूट आहे! त्याच्यावर का कोणी कारवाई करतात? शेवटी देशभक्ती महत्त्वाची, सत्य काय, नंतर पाहून घेता येतं.
अमितजी, दुसरी गडबड महाराष्ट्राची आहे. इथली पोरं फार तय्यार आहेत. यशवंतराव, बाळासाहेब, पवारसाहेब, अशा लोकांची त्यांना तालीम मिळाल्ये. म्हणजे सुरुवातीला पडली होती मागे ती, पण आता तीही तुम्हाला नडायची स्वप्नं पाहायला लागल्येत. हवा तो राजकीय विषय ‘ट्रेंडिंग’ करणं त्यांनाही जमायला लागलंय. लबाड माध्यमांची उपरणी ती आता नेटवर फेडायला शिकतायत. असं व्हायला लागलं, तर गडबड होईल. अहो आपल्या सरकारच्या काळात सगळ्यात झपाट्याने वर गेलेला ग्राफ फक्त सोशल मीडियावरच्या कर्तृत्वाचा आहे, नाही का? त्यालाही आव्हान मिळायला लागलं तर कसं चालेल? तेव्हा जरा इथल्या ‘योद्ध्या’ना तेवढं सांभाळून राहायला सांगा.
असो, तर सांगायचा मुद्दा असा, की ट्विटरने लबाड ठरवलं, तरी आम्हाला तुमचा अभिमान आहे. ही प्रभावी देशसेवा तुम्ही अशीच चालू ठेवली पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतं. ‘जयते’ महत्त्वाचं आहे, ‘सत्यमेव’ मागाहून पाहू!