सोनी मनोरंजन वाहिनीवरील ‘स्टोरी 9 मंथ्स की’ या मालिकेत सारंगधरच्या वडिलांची म्हणजे ब्रिज मोहन पांडेंची भूमिका साकारणारे अभिनेते दधी पांडेय म्हणतात की, आपण आपल्या मुलींना मान-सन्मान देऊन जीवनात अधिक समृद्ध होण्यासाठी त्यांना आधार दिला पाहिजे. कारण मुलगी हे काही कुठले ओझे नाही, तर ती कुटुंबाचा भक्कम आधार असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मालिकेने मातृत्वाची निवड करण्याच्या स्त्रीच्या अधिकाराचा विषय मांडून चर्चेला तोंड फोडले आहे. हा विषय निर्मात्यांनी रोमान्स, कॉमेडी आणि भाव-भावनांच्या गोफातून सादर केलाय. नायक सारंगधर याचे वडील ब्रिजमोहन पांडे ही भूमिका अभिनेता दधी पांडेय साकारत आहेत. हे ब्रिजमोहन पांडे जुन्या विचारसरणीचे आहेत. आपल्या मुलींनी आणि मुलाने त्यांचे जीवन जगताना आपल्याच आदेशांचे पालन केले पाहिजे असे त्यांना वाटते.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना व त्याविषयी आपले मत मांडताना ते म्हणाले, आत्ता मी जसा आहे, त्याच्या अगदी विरुद्ध ही व्यक्तिरेखा आहे. ब्रिजमोहनचे घरात वर्चस्व आहे. आपल्या कुटुंबियांनी आपले ऐकलेच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. पण व्यक्तिश: मला तसे वाटत नाही. स्त्रियांनीही त्यांना हव्या त्या पद्धतीने जीवन जगण्याचा त्यांचा अधिकार वापरला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.