राधा आणि कृष्ण यांची प्रेमकहाणी आपल्याला लहानपणापासून माहीत असते, पण दरवेळी मालिकांमध्ये ती नव्याने पाहताना आणखीच वेगळी भासते. म्हणूनच स्टार भारत वाहिनीवर सध्या सुरू असलेली ‘राधाकृष्ण’ ही मालिका प्रेक्षकांना भलतीच आवडतेय. होळी, रंगपंचमीचा सण ऐन तोंडावर येऊन ठेपला आहे. या रंगारंग सोहळ्यानिमित्त स्टार भारत वाहिनीनेही या मालिकेत होळी स्पेशल भाग ठेवलेला असून तो पाहून प्रेक्षकांनाही घरीच होळी साजरी करण्याचा संदेश दिला आहे.
होळीच्या निमित्ताने राधा (मल्लिका सिंह) कृष्णाला (सुमेध) रंग लावायचे ठरवते. त्यासाठी ती देवी पार्वतीला 5 प्रकारचे रंग तयार करायला सांगते. सगळी तयारी होते, पण ऐन होळी येते तेव्हा सांभ राक्षस राधाची सगळी तयारी होळीच्या अग्नीत टाकून देतो. मग कृष्ण या होळीच्या राखेचाच रंग आपल्याला लावण्यास राधाला सांगतो. पूर्ण ब्रह्मांड राधाकृष्णाची ही बेरंग होळी पाहाते. बॉलीवूडमधल्या रेखा आणि चिन्नी प्रकाश यांनी यावेळी डान्स आयटमची कोरिओग्राफी केली आहे. या गाण्यासाठी 1 हजार किलोंचा रंग आणि लेटेस्ट कॅमेरा टेक्निक वापरण्यात आले आहे म्हणे.
हा होळीचा विशेष भाग पाहून प्रेक्षकांनी घरातच राहून होळीचा आनंद घ्यावा असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. हा भाग आजच 26 मार्च रोजी रात्री 9 वाजता स्टार भारत वाहिनीवर पाहायला मिळेल.