जुहू येथील निवासी इमारतीत बेकायदा बदल करत हॉटेल थाटल्याने अडचणीत आलेला अभिनेता सोनू सूद याला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाईसंदर्भात पालिकेने बजावलेल्या नोटिसीला हायकोर्टाने 13 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली.
सोनूने जुहू येथील शक्तीसागर इमारतीत बेकायदेशीरपणे बांधकाम करत हॉटेल सुरू केल्याप्रकरणी पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने पालिकेने गेल्या वर्षी सोनू सूदला नोटीस पाठवली. पालिकेच्या नोटिसीविरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र दिवाणी न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावल्याने सोनूने अॅड. डी.पी. सिंग यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी अभिनेता सोनूच्या वतीने अॅड. अमोघ सिंग यांनी आपल्या आशिलाने कोणतेही बेकायदा बांधकाम केलेले नाही. त्यामुळे पालिकेने बजावलेली नोटीस रद्द करण्यात यावी असा युक्तीवाद केला.
अन्यथा परिणामांना सामोरे जा
सहा मजली इमारतीत 24 खोल्या असलेले हॉटेल याचिकाकर्त्याकडून विनालायसन्स चालवण्यात येत असल्याची माहिती पालिकेने देताच आपण परवान्याशिवाय हॉटेल व्यवसाय करीत आहात का, अशी विचारणा न्यायालयाने केली. एवढेच नव्हे तर ही बाब सत्य असल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशी तंबीही हायकोर्टाने सोनू सूदला दिली.