प्रेमानंतर दुसरी बलवान भावना म्हणजे तिरस्कार. त्यातून सूडाची तहान उत्पन्न होते आणि उत्कटता वाढते. पण द्वेष असलेल्या ठिकाणी प्रेम वाढू शकते का? एकमेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतलेल्या दोन व्यक्ती प्रेमात पडू शकतात का? असेच काहीसे कथानक असलेली ‘बावरा दिल’ ही नवी मालिका 22 फेब्रुवारीपासून कलर्स या हिंदी मनोरंजन वाहिनीवर सुरू होणार आहे.
यात सिध्दी (किंजल धामेचा) आणि शिव (आदित्य रेडीज) यांची द्वेषपूर्ण कहाणी पाहायला मिळेल. शिव हा एक तगडा, अँग्री यंग मॅन असून तो शक्तिशाली राजकारणी आक्काबाईचा (सुमुखी पेंडसे) अभिमान आणि आनंद आहे, तर सिध्दी एक सुशिक्षीत आणि हुशार मुलगी असून तिच्यात नैतिकतेची भावना जबरदस्त आहे. शिव आणि सिध्दी एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची सुरूवात एका गैरसमजाने होते आणि त्यांच्यात तिरस्काराचे नाते तयार होते.
मालिकेच्या संकल्पनेविषयी वायकॉम 18च्या चीफ कंटेंट ऑफिसर मनीषा शर्मा म्हणाल्या, द्वेषाच्या भावनेतून सुरू झालेले नाते दोन व्यक्ती कशाप्रकारे प्रेमाच्या जादूत बदलतात हे या मालिकेत सुंदररित्या दाखवले गेले आहे. सिध्दीचा प्रामाणिकपणा, शिवाची गुंतागुंत, आणि आक्काबाईचे शक्तिशाली व्यक्तिमत्व, प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.