शीर्षकापासून कथानकापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये उजवा असलेला ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक शुभम रे यांनी गुढीपाडव्याचे निमित्त साधत या चित्रपटाची घोषणा केली. शीर्षकावरून या चित्रपटात काहीसं गंमतीशीर कथानक पहायला मिळणार असल्याची चाहूल लागते. झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनवण्यात आलेल्या या चित्रपटात प्रकाश भागवत, प्रिया गमरे, संजीवनी जाधव, विराग जाखड, डॉ. विलास उजवणे, रंगराव घागरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. सिनेसृष्टी हा समाजाचा आरसा मानला जातो. यामुळे रूपेरी पडद्यावर सादर होणाऱ्या चित्रपटांमध्येही समाजात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिबिंब उमटते.
या चित्रपटाद्वारे समाजव्यवस्था आणि जनतेची मानसिकता यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिग्दर्शक शुभम यांचं म्हणणं आहे. हे एक सामाजिक सटायर असल्याने प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक स्तरातील प्रेक्षक पोट धरून हसतील असा विश्वास शुभम रे यांनी व्यक्त केला आहे. निखील कांबळे यांनी या सिनेमाची सिनमॅटोग्राफी केली असून कला दिग्दर्शन विराग जाखड यांनी केलं आहे. संगीत समीर सोनू यांनी दिले आहे, तर मेकअप-हेअर डिझाइन हेमंत पालकर यांनी केलंय. अश्विनी चंद्रिकापूरे यांनी या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी केली असून, राणी वानखेडे यांनी कॉस्च्युम डिझाईन केलं आहे.