रोम जळत होतं तेव्हा रोमचा सम्राट नीरो फिडल वाजवत होता असं म्हणतात..
…आपला देश भाग्यवान आहे… आपल्याकडे एक सोडून दोन नीरो आहेत आणि देश कोरोनाच्या आगीत जळत असताना ते निवडणूक निवडणूक खेळत आहेत… त्यांचाही नाईलाज आहे… लोकशाहीने पाच वर्षांसाठी लोकांकरता काम करण्यासाठी त्यांना नेमून दिलेलं आहे, राज्यकारभार करण्यासाठी निवडून दिलेलं आहे, हे खरं आहे. पण दोघांनाही सम्राट आणि उपसम्राट असल्यासारखंच वाटतं… शिवाय त्यांना दुसरा कोणताही खेळ येत नाही… गेल्या सात वर्षांत त्यांनी या निवडणुकीकडून त्या निवडणुकीकडे आणि या भाषणाकडून त्या भाषणाकडे, असाच प्रवास केलेला आहे… मध्ये थांबा फक्त डिझायनर कपडे बदलण्यापुरता, एखादा झगमगीत इव्हेंट करून आधीच्या सरकारची एखादी योजना नाव बदलून सादर करण्याकरता किंवा वर्ल्ड टूरमध्ये राहून गेलेला एखादा देश पाहण्यापुरता.
लहान मुलांच्या बाबतीत असं सांगतात की आईवडील काय सांगतात, काय शिकवतात, त्यातून मुलं काहीच शिकत नाहीत… मुलं आईवडिलांकडे पाहून शिकतात… म्हणजे आईवडील महात्मा गांधी कसे प्रात:स्मरणीय आहेत, असं फक्त तोंडदेखलं शिकवत असतील आणि वास्तवात नथुरामला पंडित म्हणून त्याची पूजा करत असतील, तर मुलं नथुरामाला महात्मा मानू लागतात, त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू लागतात- गांधीथोरवीची पोपटपंची फक्त परीक्षेपुरतीच गिरवायची असते, हे त्यांना माहिती असतं. त्याचप्रमाणे देशाचे नेते फक्त टीव्हीवरून किंवा जाहिरातीच्या फलकावरून लोकांपुढे येऊन ‘जब तक दवाई नहीं, तब तक कडाई’ वगैरे ग्यान सांगत असतील आणि स्वत: मास्कही न लावता बेदरकारपणे फिरत असतील, हजारो लोकांच्या सभा भरवत असतील, रोड शो करत असतील, प्रचारफेर्या काढत असतील, तर लोक त्यांनी दिलेलं ज्ञान बाजूला ठेवतात आणि त्यांचं अनुकरण करतात… आज देशात निम्म्याहून अधिक लोक मास्क वापरत नाहीत, असं टाइम्सच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झालंय. उरलेले निम्मे तो वापरतात, पण चुकीच्या पद्धतीने, तोंडावर किंवा हनुवटीवर ठेवून, तो भाग सोडा. पण, मास्कबिस्कची काही गरज नसते, अशी या शुंभमेळ्याची समजूत होते, त्याला हे दोन नीरोही तेवढेच जबाबदार आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या वाघिणीला हरवण्यासाठी जंग जंग पछाडत फिरतायत आणि एरवी कशाकशाची सुओमोटो दखल घेणारं सर्वोच्च न्यायालय चिडिचुप्प आहे… या दोघांना कानपिचक्या देण्याची हिंमत ना त्यांच्यात आहे ना सरकारच्या इतर कोणत्याही यंत्रणेत… भविष्यात अनेक राज्यपालपदं, राजदूतपदं, शोभेची इतर पदं रिकामी होणार आहेत, हे या यंत्रणांच्या प्रमुखांना माहिती आहे. गेलाबाजार खासदारकी तर कुठेच नाही गेली?
एकीकडे हे दोघे आणि निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये सगळ्याच पक्षांचे नेते बिनबोभाट फिरतायत, तिकडे कुंभ मेळ्यात हजारो भाविक गंगेत डुबक्या घेतायत, भाजपचे गुजरातचे कोरोनाग्रस्त लोकप्रतिनिधी आपण कोविडग्रस्त असताना कुंभमेळ्यात जाऊन आलो, हे मोठा पराक्रम केल्याच्या थाटात सांगतायत, गंगामैय्याच्या कृपेने कोरोनाबिरोना काही होणार नाही, असं उत्तराखंडाचे मुख्यमंत्री छातीठोकपणे सांगतायत- तेही एका आखाड्याच्या महंतांना कोरोनाने काळदरीत ढकलले असताना आणि उत्तर प्रदेशाच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांना या रोगाने गाठले असताना. अशा वातावरणात कोणता माणूस कोरोनाचं संकट गंभीरपणे घेईल आणि टाळेबंदीचे नियम पाळील, कोरोनाचे नियम पाळील. आज पोलिसांनी रस्त्यावर एखाद्याला कोरोनाच्या नियमांचा भंग करताना पकडलं, तर तो त्यांना उलटा ठणकावतो, आधी एखाद्या नेत्याला पकडण्याची हिंमत दाखवा. तिथे शेपूट घालता आणि आम्हाला का त्रास देता?
पोलिसांकडे तरी याचं काय उत्तर असणार?
कोरोनाची दुसरी लाट आधीच्या लाटेइतकी प्राणघातक नाही, पण तिची संसर्गक्षमता अचाट आहे. हा विषाणू हवेतून प्रवास करायला लागला आहे, असं नवं संशोधन सांगतं. गेल्या वर्षीच्या साथीमध्ये आपल्या माहितीतला एखाददुसरा माणूस संसर्गबाधित झालेला होता… आज एखाददुसराच माणूस असा असेल, ज्याच्यापर्यंत हा संसर्ग पोहोचलेला नाही. मुंबई, पुण्यासारखी महानगरं, आसपासची उपनगरं यांच्यामध्ये दिवसरात्र अँब्युलन्सचे आवाज येत असतात, रूग्ण इकडून तिकडे नेले जात असतात. एकेका हॉस्पिटलबाहेर अत्यवस्थ रूग्णांची रूग्णवाहिकांमध्ये रांग लागलेली असते. स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारांसाठी वेटिंग आहे. हे चित्र गुजरात, उत्तर प्रदेशात आणखी भीषण आहे. तिथलं सरकार कडक उपाययोजना करतं… छे छे, आरोग्यसुविधा वाढवत नाहीत ते, दुरवस्थेची आणि दुर्व्यवस्थेची चित्रं कोणी टिपू नयेत यासाठी त्याभोवती पत्रे मारतं. त्यांना तेच येतं- त्यांच्या महामहीमांनीही ट्रम्पभेटीत हाच स्वस्त उपाय केला होता. गरिबी हटवणं, गरीबांचं उन्नयन करणं हा काही त्यांचा अजेंडा नाही. त्यामुळे गरिबी झाकण्यासाठी भिंती बांधल्या की झालं- त्यातही कंत्राट देता येतंच कोणा स्नेह्याला.
अशा परिस्थितीत, केंद्र सरकारला, शीर्षस्थ सर्वशक्तिमान नेत्यांना कोरोनासंकटाचं शून्य गांभीर्य असताना, महाराष्ट्रातलं सरकार या आजाराशी झुंजतं आहे, माणसं वाचवण्यासाठी, त्यांना जगवण्यासाठी शक्य ते करतं आहे. अशा वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करणं तर सोडाच, सरकार पाडण्यापलीकडे काही न सुचणारे विरोधी पक्षनेते आपल्याला लाभले आहेत, हे महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीचं दुर्दैव.
पण, तेही केंद्रातल्या वडीलधार्यांकडे पाहूनच शिकताहेत… वेगळं काय शिकू शकतील ते?