होळीच्या तसंच धुळवडीच्या दिवशी सामूहिकरित्या अभद्र, अश्लील, लज्जेने स्त्रियांची मान खाली जाईल, अशा शिव्या का घालतात याचं कोडं गोप्या सातबंडेला अनेक वर्ष पडलं होतं. या पवित्र दिवशी ‘परगेशन ऑफ माईंड’ म्हणजे मनातील अनिष्ट भावना व बीभत्स विचार यांना तोंडाने मोकळी वाट करून देण्याचा चांगला उद्देश असतो, हा पारंपरिक विचार मात्र गोप्याला पटत नव्हता. होळीच्या नावावर काहीही खपवतात, असं तो ठामपणे सांगायचा. साले, आपल्या मनातील खुन्नस काढण्यासाठी कोणाला तरी गिर्हाईक करून आपली शिव्या देण्याची खाज भागवतात, हे तो एक सणसणीत शिवी देऊनच सांगायचा.
एकमेकांची उणीदुणी जाहीरपणे काढण्यासाठी होळीच कशाला पाहिजे? नाहीतरी वर्षभर आपल्याकडे शिव्यांचा सुकाळ असतोच हे सांगायला विद्वानांची गरज नाही, हे सांगताना नेहमी रस्त्याने चालताना तुम्हाला कुठूनही एक-दोन शिव्या कानावर आल्या नाहीत तर चुकल्यासारखं वाटेल. शिवाय प्रत्येक शहराच्या आणि गावाच्या शिव्यांची भाषा वेगळी. त्या भाषेची स्वत:ची संस्कृती असते, हा गोप्याने लावलेला शोध खराच होता. मात्र या शिव्यांमध्ये मराठीतल्या पहिल्या शिलालेखापासून ‘आई’सारख्या शब्दांची विटंबना का बरं केली जाते, याचं कोडं गोप्याला सुटत नव्हतं. भारतातील एकही भाषा अशी नाही की त्या भाषेत या परमपवित्र शब्दाची अशी धिंड काढली जाते आणि त्याबद्दल कोणी आंदोलन किंवा मोर्चेही काढत नाही, याची गोप्याला मनापासून चीड यायची. एकूण, शिव्या या विषयावर सखोल संशोधन करण्याची प्रतिज्ञा गेल्या वर्षीच्या होळीला गोप्याने केली आणि एका वर्षात ती तडीसही नेली. यावर्षीच्या पेटलेल्या होळीत तिची एक प्रत समर्पण करून समस्त होळीकरांच्या बोंबांच्या गजरात तिचं गुलाल उधळत प्रकाशन होणार आहे.
गोप्याच्या या संशोधनपर ग्रंथाच्या बातमीची अनेकांनी महिन्यापूर्वी खिल्ली उडवली होती. गोप्या काय घंटा लिहिणार, इतपत सभ्य भाषेत त्याची टर उडवण्यात आली. पण गोप्या फक्त मंद स्मित करत होता. कुणी खरंच या विषयावर त्याच्याशी गंभीरपणे म्हणजे सिरीयसली बोलायला गेलं तर मात्र तो आपले मुद्दे व्यवस्थित सांगत असे.
त्याच्या संशोधनपर ग्रंथाची वार्ता कानी गेल्यावर एक संस्कृतीरक्षक गृहस्थ त्याच्याशी वाद घालण्यासाठी आले. ते म्हणाले, गोप्याजी, तुम्ही आपल्या भारतीय शिव्यांची महानता न समजता तिचे धिंडवडे जगासमोर काढत आहात. विदेशात तर याच्याहून भयंकर अर्थाच्या शिव्या देतात. त्यावर गोप्या म्हणाला, ट्रकच्या ट्रक भरतील इतक्या आपल्याकडील शिव्यांचे पुरावे मी तुम्हाला आणून देतो. विदेशात आई बहिणीचा उद्धार करणारी एकही शिवी आढळणार नाही. लिंगवाचक शिव्याही मोजक्याच. फार तर यू फूल, बास्टर्ड, रास्कल, डॉन्की, स्वाइन, सिली वगैरे. आपल्यासारख्या शिव्यांच्या म्हणी आणि वाक्प्रचार नाहीत तिथे. आपल्याकडे पायलीला पासरीभर असले घाणेरडे शब्दप्रयोग. त्याशिवाय भांडणात शिव्या द्यायला जोरच येत नाही. उद्या आपल्याकडील शिव्या, वाक्प्रचार आणि म्हणींची विदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली ना तर त्या ग्रंथाला नक्कीच नोबेल किंवा गोबेल्स पारितोषिक मिळेल.
– हा तर आपला गौरव आहे. पण आणखी प्रसिद्धी हवी असेल तर आपण तो नाकारायचा.
– ते ती दिल्लीतील दोन माणसे ठरवतील आता या तुम्ही. माझी मुलाखत घ्यायला पब्लिक चॅनेलवरची एक मुलगी येणार आहे. तेव्हा तुम्ही कल्टी घ्या.
– आता मी तुम्हाला मनातल्या मनातच अस्सल मराठी शिव्या घालत प्रयाण करतो. ती बघा. आलीच मुलगी.
– मी आय…
– च्याऐला तुमचीच वाट बघत होतो. विचारा काय विचारायचं ते. उभ्या उभ्याच नको. बसून घ्या.
– या इतक्या गहन विषयाला तुम्ही कसा काय हात घातला?
– ती माझी खासियतच आहे. बरेच दिवस डोक्यात किडा वळवळत होता. अखेर होळीच्या कृपेने मुहूर्त मिळाला. एका वर्षात सारा महाराष्ट्र पालथा घातला. एकही जिल्हा, तालुका, गाव, वाडी आणि पाणवठे सोडले नाहीत. जिथे जिथे शिव्यांचा सुकाळ आहे तिथे दबा धरून भेटी दिल्या. खूप कष्ट पडले. लोकांच्या नकळत एवढं रेकॉर्डिंग केलंय ते ऐकलंत तर चक्कर येऊन पडाल तुम्ही. इतक्या विद्वानांच्या भेटी घेतल्या, अनेक कोश पाहिले. अशिक्षित, सुशिक्षित ग्रामीण, शहरी स्त्री-पुरुषांशी बोललो तेव्हा त्यांनी बिनधास्त खरी माहिती सांगितली. शिवाय मला माहित नसलेल्या कितीतरी शिव्या सांगितल्या. आता माझ्या संशोधनातील शिव्यांच्या संग्रहात जवळजवळ एक हजार चारशे सेहेचाळीस शिव्या आहेत. त्यांची मी अनेक प्रकारे वर्गवारी केली आहे.
– अनेक प्रकारे म्हणजे? मला फार तर नळावरच्या भांडणातील शिव्या माहीत आहेत. फार तर रस्त्यावरील दोन गटातील मारामारीत वापरल्या जाणार्या शिव्या ठाऊक आहेत. पण तुम्ही म्हणता तशी शिव्यांची वर्गवारी होऊ शकते यावर मात्र माझा अजून विश्वास बसत नाही.
– खूपच भोळ्या आहात तुम्ही. मी तुम्हाला माझा संशोधनपर शिवीग्रंथ चाळायला दिला असता. त्या शिव्यांवर मी व्यक्त केलेले विचार वाचून माझ्या संशोधनात किती सामर्थ्य आहे, हे तुम्हाला समजलं असतं. पण त्यातलं कुठलंही पान वाचून नव्हे तर फक्त बघून तुम्हाला चक्कर आली असती आणि तुम्ही मलाच शिव्या देत सुटला असता. स्त्रीच्या हाती अशा प्रकारचं वाङमय पडू न देणं एव्ाढी सभ्यता आहे माझ्याकडे. उद्या एखाद्या प्रकाशकाने माझा हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला तर तुम्ही तो विकत घेऊ शकता आणि वाचूही शकता तेही तुमच्या जबाबदारीवर. काही गोष्टी चोरून वाचायच्या असतात, चोरून बघायच्या असतात. अहो, स्वत:च्या बायकोलाही मी त्या हस्तलिखिताची कच्ची प्रत दाखवू शकत नाही. कडी कुलुपात बंद करून ठेवलीय पत्र्याच्या जुन्या पेटीमध्ये- केवढा मोठा दस्तावेज आहे तो.
– शिव्या देणे ही मानवाची उपजत प्रवृत्ती आहे असं आपल्या बोलण्यावरून वाटतं. तरीही ही एक प्रकारची विकृतीच आहे, असं तुम्हाला नाही का वाटत?
– अजिबात नाही. स्त्री-पुरुषांचा मानवी देह आणि त्यातील कोणतेही अवयव असोत, त्यांच्या बोलण्यातील वापर करत म्हणी आणि वाक्प्रचार तयार झाले. शरीरातील लैंगिक अवयवांच्या स्थानाला लपवाछपवीत वस्त्र किंवा कपड्यांचं आवरण मिळालं. त्यांच्याविषयीचं कुतुहल हा त्यांच्या शरीरातील महत्त्वाच्या कार्यापेक्षा त्यांच्या हेटाळणीचा किंवा टिंगलटवाळीचा भाग झाला. त्यातूनच त्यांचा वापर ग्राम्य, अश्लील म्हणी व वाक्प्रचार करण्यासाठी सुरू झाला. त्यातून स्त्री असो वा पुरुष मानवाने अशा अवयवांवर आधारीत अश्लील वाक्प्रचार आणि म्हणी तयार करताना आपल्या कल्पनाशक्तीची परिसीमा गाठली. या वाक्प्रचार आणि म्हणींना अश्लील म्हणण्यापेक्षा असभ्य म्हटलं तर अधिक बरं, ते चारचौघात उच्चारण्याची आपल्यालाच काय कुणालाही लाज वाटेल. शहरी वातावरणात तर त्याबद्दल लाज आणि घृणा वाटते. मात्र काही ग्रामीण भागात मात्र यावर आधारीत शिव्यांचा सुकाळ दिसतो. त्याला अश्लील, अभद्र, ग्राम्य, असंस्कृत, असभ्य असं काहीही म्हटलं तरी त्याच्या खोलात गेलं तर त्याचे अनेक पैलू दिसतील.
– हे संशोधन म्हणजे विकृत मनोवृत्तीने केलेलं कार्य आहे, असं नाही तुम्हाला वाटत?
– नाही. हा जीवनाचाच एक झाकोळलेला अविभाज्य भाग आहे आणि संस्कृतीचाही. त्याची कितीही हेटाळणी केली तरी तो अभ्यासाचा विषय आहे, हे नाक मुरडत भले भले विद्वानही मान्य करतात. भले, जीवनात त्याचे स्थान अजिबात महत्त्वाचे नसले तरी होळी आणि त्या अश्लील शिव्यांचे नाते जोडणे मला मान्य नाही. परंतु असभ्य वाक्प्रचार, म्हणी आणि शिव्या याचं नातं खास आहे. ते दुर्लक्षित राहता कामा नये.
– सभ्य म्हणी आणि असभ्य म्हणी अशी वर्गवारी करणे आवश्यक आहे का?
– अर्थातच. नाहीतर असभ्य म्हणी ऐकून तुम्ही पळून जाल. अशा म्हणींमध्ये लैंगिक अवयव आणि त्यांचे व्यापार यांचा खुल्लमखुल्ला उल्लेख असतो. चारचौघात त्या उच्चारल्या तर ऐकणारा अस्वस्थ होईल. अशा म्हणींमध्ये प्राणी आणि त्यांचे व्यवहार यालाही माणसाने स्थान दिले. म्हणूनच सर्वच सभ्य आणि असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार आपल्या लोकसंस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. त्यात इंद्रिय व्यवहारालाही स्थान मिळाले आहे. आपल्याला ते सारे ऐकताना किंवा वाचताना अवघडल्यासारखे होईल. पण त्यातही वापरलेली अचाट आणि अफाट कल्पनाशक्ती हीसुद्धा प्रतिभासामर्थ्यापेक्षा कणभरही कमी नाही, हा माझा निष्कर्ष आहे. जे उल्लेख आपण व्यवहारात सभ्य शब्दांचा वापर करून करतो तसाच सोवळे ओवळेपणा इथे नसतो. सारं काही सरळसोट असतं! कुणाला काय वाटेल, अशी पर्वा इथे नसते. अश्लील, बीभत्स, ग्राम्य, हीन म्हणून जे जे काही असतं त्याची उतरंड इथे म्हणी आणि वाक्प्रचारात दिसते. कुठल्याही शब्दांचे वावडे इथे नसते. कल्पनाशक्तीबरोबर विनोदबुद्धीचा इथे चपखल उपयोग केलेला जाणवतो. इंद्रियवाचक शब्द आणि त्यांच्याशी संबंधित व्यवहार याना प्राधान्य देऊन हे वेगळेच विश्व आकाराला आलेलं असतं. सोयरिकींच्या नात्यांच्याही इथे विचार केला जात नाही. संसारापासून व्यभिचारापर्यंत अनेक गोष्टींवर आधारीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा खजिना या साहित्यात आहे. लोकजीवनाचे नैसर्गिक प्रकटीकरण असं फार तर याला म्हणता येईल. तुमच्या जागी एखादा पुरुष असता तर मला आणखी खुलेपणाने बोलता आलं असतं. पण तरीही तुमच्या चॅनेलने याबद्दल माझी मुलाखत घेण्याची उत्सुकता दाखवली याबद्दल मी आभारी आहे. हा विषय तुमच्या चॅनलवर आला तर तुमच्या निर्मात्याला होळीच्या बोंबा मारायला आणखी जोर येईल. कारण सारा भारत देख रहा है! आता तुम्ही पळा. माझी होळीनिमित्त पारायणे करायची वेळ झाली. कसली ती तुम्ही ओळखा.
ती चॅनेलवाली निघून गेल्यावर गोप्याने आपल्या संशोधनपर शिव्यांच्या बाडाच्या दोन प्रती सॅनिटायझर शिंपून कपाटामध्ये लपवून ठेवल्या. होळीच्या पुजेनंतर होळी पेटवल्यावर गार्हाणे घालून त्यातील एका प्रतीचे साग्रसंगीत पूजा करून होळीत दहन करून प्रकाशन करायचे होते. त्या तयारीला गोप्या लागला.
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)