– अशोक नायगावकर
मी जन्मलो तेव्हा
जातक मांडलं तर
याला
आयुष्यभर मृत्यूचे भय म्हणून
काळजी
घ्या म्हणाले तेव्हापासून मी उटणं लावतो
मग ऑफिसात पण
सगळे मला खूप जपायचे
लोकांना कसं
बालपणी खस्ता खाल्ल्या
की आत्मचरित्र लिहायला
मजा येते
आमच्या बाबतीत असं काहीच नाही
लोकांना चड्डीच नसते
आम्हाला मात्र
वाळलेली चड्डी नसायची
मग आमचं कोण छापणार
आमच्या आयुष्यात
गरिबीचा खूप प्रयत्न केला
पण काही घडायचंच
नाही
पण मी शाळेत हुशार
विचारायच्या आधीच उद्याची
तारीख सांगायचो
एकदा तर मी दार उघडले
तेव्हा अंधार आत आला
तसे सगळे घाबरले
मग माझा दाताचा
प्रॉब्लेम झाला तर त्यांनी
डोळ्याच्या डॉक्टरांकडे नेले
तर ते म्हणाले
न्यूरॉलॉजिस्टला दाखवा
ते बिचारे चांगले होते
(डॉक्टर खरे तर चांगलेच
असतात, पण बिलामुळे गैरसमज
होतात.)
म्हणाले,
गरम वाफ घ्या!
मग मी वाफ कुठे मिळते
म्हणून एपीएमसी मार्वेâटमधे गेलो
तिथे कडक चेकिंग होतं
त्यांनी
वडिलांचे एसएससी सर्टिफिकेट
आणलंय का विचारलं?
आणि बायकोची जन्मतारीख विचारली
माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही
(आपण कशाला दुसर्या कुणाच्या बायकोची
जन्मतारीख सांगायची!)
तर तो म्हणाला,
अहो या वयात लोकांची दुसरी लग्नं
होतात!
त्याला दया आली आणि आत सोडलं
तर तिथं खूप गाळे होते
मग मला
‘आ…’
करायला सांगितलं
आणि सगळं नॉर्मल आहे
म्हटल्यावर
मी धावतच सुटलो
तरी पण धावायचा
टोल भरावाच लागतो
आपल्याला काही झालं नाही
या आनंदात
मी
हत्तीवरून ब्लडशुगर वाटली
आता
सगळेच विचारतात
तुम्ही लग्न का केलं नाहीत?
तर
म्हणालो बायको निघून जाण्याचं
भय असतं
रात्री सगळे नवरे चाचपून
बघतात
बायको आहे की निघून गेली
त्यामुळे मला झोप
चांगली लागते
उलट मला
जाग यायच्या गोळ्या
लिहून दिल्यात डॉक्टरांनी
परवा तर
पहाटे साडेतीनलाच
सरकार पडलं
त्यात दहा कोटी लोक
दबले
पण राज्यपाल छपरावर
बसले होते
ते मात्र वाचले
फायर ब्रिगेडवाले आले
पण उशिराने
मग लोक वाट पाहून स्वत:च
निघून गेले
हल्ली सगळे
हुशार झालेत
काही घडलं की लोकांना
वाटतं आता पोलीस येतील
पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत
थांबूया
मग लोक कंटाळून निघून जातात
पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो
हल्ली बेकारी आहे
त्यामुळे सगळे
एकमेकांना
काही काम आहे का विचारतात
मी त्यांना गवत काढाल का विचारलं
तर अतिवृष्टीत सगळं गवतच वाहून गेलं
आमची
शेती असती तर मी सगळ्यांना
कामाला ठेवलं असतं
पण मी तर ऑफिसात असतो
मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या
आपलं काही
दिवसासारखं नाही
रात्र पाणी घालत राहाते
म्हटलं की
दिवस बरोब्बर उगवतो
दुसर्या दिवशी
खत वगैरे घालावं लागत नाही
सेंद्रिय की काय म्हणतात तसं
खरं तर
नोकरी लागली की
वेळ कसा घालवायचा म्हणून
मी सगळीकडे घड्याळं लावून ठेवलीत
एकदा टॉयलेटमधे
किती वाजलेत
मग हॉलमधे किती
वाजलेत
म्हणजे दिवसभर छान टाइमपास होतो
माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो
तो आठवडाभर चालूच राहातो
पुन्हा रविवारी
पंतप्रधान भेटतातच
सकाळी छान गप्पा मारतात
हल्ली बोलणारं तरी
कोण राहिलंय म्हणा
आणि ऐकणारं तरी कोण आहे
मी लग्न
केलं नाही, कारण मुलं झाली असती
आणि त्यांनी
ऐकलं नसतं तर
आपलं डोकंच फिरलं असतं
परवा मी कॉलेजच्या
गॅदरिंगला गेलो होतो सर्वांना सांगितलं
बेकारी वाढत चाललीय
पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही
तर लोकसंख्येला आळा बसेल
खरं तर
हे सगळं मला
वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं
पण वेड लागल्यावर
लिहून काढलं
परवा जीए भेटले
म्हटलं वेळ कसा घालवता
तर
टीव्हीवर मालिका बघतो
म्हणाले
मग मात्र आपण शहाणे वाटायला
लागलं!