अखिल विश्वात मराठी, महाराष्ट्राची पताका फडकावित असलेल्या मराठीजनांना साप्ताहिक मार्मिक मानाचा मुजरा करीत आहे. तसेच, महाराष्ट्रधर्म, मराठी संस्कृतीसाठी डिजिटल मार्मिकच्या माध्यमातून जगभर हाती घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची ही मुहूर्तमेढ ठरते आहे. मार्मिकच्या माध्यमातून जगभरातील यशवंत-कीर्तीवंत मराठीजनांची या सदराच्या माध्यमातून आम्ही आपल्याला भेट घडवू. अमेरिकास्थित प्रसिद्ध उद्योजक, मराठी लेखक आणि आता मिशिगन प्रांताच्या लोकप्रतिनिधीगृहात स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह (आमदार) म्हणून निवड झालेले श्री ठाणेदार यांनी साधलेला हा संवाद…
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण जगानेच अनुभवली. त्यामध्ये मिशिगन प्रांताच्या लोकप्रतिनिधीगृहात स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून येण्याचा बहुमान मला प्राप्त झाला. आपल्या भाषेत मी आता आमदार झालो! अर्थात, केवळ एक आमदार या पलीकडे जात अशा स्टेट रिप्रेझेंटेटिव्हची व्याप्ती इथे अनेकार्थाने मोठी असते. त्यामुळेच, एक मराठी म्हणून मला या कामगिरीची सार्थ अभिमान वाटतो.
अमेरिका म्हणजे झगमगती दुनिया. जगभरातील लाखो नागरिक आपले ‘अमेरिका ड्रीम’ घेऊन इथे येत असतात. त्यामध्ये आपल्या भारतीय, महाराष्ट्रीय आणि मराठीजनांची संख्या खूप मोठी आहे. एक उद्योजक, लेखक या नात्याने यापूर्वीदेखील त्यांच्यासाठी अनेक उपक्रम राबविले. आता लोकप्रतिनिधी या नात्याने माझी ही चळवळ अधिक व्यापक करता येणार आहे.
अमेरिकेच्या दुनियेची कितीही मोहिनी पडली, तर आपले मराठीचे संस्कार हेच आमच्या हृदयस्थानी आहेत आणि राहतील. लहानपणापासून घरी आई-वडिलांचे संस्कार आणि शाळेत शिक्षकांचे संस्कार, यांचा ठेवा आजही प्रेरणादायी ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळकांच्या गोष्टी, मराठी साहित्याच्या माध्यमातून झालेले संस्कार महत्वाचे ठरताहेत. मराठी माध्यमात शिकल्यामुळे मराठी साहित्याचा माझ्यावर खूपच प्रभाव आहे. अगदी बा. भ. बोरकर यांच्यापासून ते इंदिरा संत यांच्यापर्यंत विविध विषयांवरील मराठी वाचनामुळे समृद्ध झालो. त्यामधून मराठी संस्कृतीचे संस्कार कायम राहिले. ते आजही हृदयात जपून आहे. त्याचीच प्रेरणा, ठेवा आजही आहे. किंबहुना, अमेरिकेत गेल्यावर आपली संस्कृती, संस्काराचे महत्व अजूनच अधोरेखित होते.
बृहन्महाराष्ट्र मंडळाची (बीएमएम) भूमिका मोलाची
अमेरिकेतील आमच्या पिढीत हे मराठीचे संस्कार टिकून आहेत. पण, आता अमेरिकेतच वाढलेल्या पुढच्या पिढीमध्ये हे संस्कार रुजविणे, टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान आहे. त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण मिळणे शक्यच नाही. तसेच, अमेरिकी संस्कृतीचा त्यांच्यावर दररोज भडिमार होतो आहे. पण, अशा परिस्थितीतही त्यांचे आई-वडील आणि अमेरिकेतील मराठी मंडळांच्या चळवळीमुळे मराठी संस्कार टिकून राहण्यास, पुढील पिढीपर्यंत वृद्धिंगत होण्यात खूप मदत होते.
सेंट लुईस येथील मराठी मंडळाची मी स्थापना केली. पुढे बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचा अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ पदांच्या माध्यमातून आता ही चळवळ अमेरिकेत सर्वदूर पसरली आहे. पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन आम्ही सॅनफ्रान्सिस्को येथे आयोजित केले होते. तसेच, मराठी साहित्यिक, कलावंत, नाटके, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या माध्यमातून मराठीसाठी जे जे काही करता येईल ते करतो.
दर दोन वर्षांनी आमचे अधिवेशन भरविण्यात येते. त्यामध्ये चार-पाच हजार मराठीजन एकत्रित येतात. खूप धमाल येते. पण, आता त्यामध्ये तरुण मंडळींची संख्या वाढविण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे. त्यासाठी ई-मार्मिकसारखे डिजिटल प्लॅटफॉर्मवरील उपक्रम खरोखरीच मोलाचे ठरतील. नवीन पिढीशी कनेक्ट होण्यासाठीची संधी त्यामधून मिळेल. त्यासाठी मी सर्वतोपरीने मदत करेन आणि आमची मराठी मंडळेदेखील नक्कीच उत्साहित होतील.
आपल्या महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे. महाराष्ट्रात आज मोठ्या संख्येने तरुणवर्ग आहे. त्याची ऊर्जा, बुद्धिमत्ता अफलातून आले. गरज आहे ती त्यांना योग्य चालना देण्याची. पाश्चात्यांचे अनुकरण न करता, आपली संस्कृती, स्थानिक गरजा-समस्या यांच्यावर आधारित इनोव्हेटिव्ह स्मॉल बिझिनेस व्हेंचर विकसित करण्याची संस्कृती अंगीकारली पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाधारित प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करता येईल.
तसेच, इंग्रजी भाषा आत्मसात करणे आवश्यकच ठरते आहे. त्यावर प्रभुत्व मिळवायलाच हवे. इंग्रजी ही जागतिकीकरणाची भाषा आहे. आपल्या मराठी युवकांमध्ये त्याबाबत न्यूनगंड आहे. तो दूर करणे गरजेचे ठरेल. मात्र, इंग्रजीचा अंगीकार करताना मराठी भाषा-संस्कृतीचा विसर पडायचा नको. हे दोन्ही एकमेकांना पर्याय नाही, तर, ते एकमेकांना पूरक आहेत! मराठी भाषेशी निगडित आपली साहित्य-संस्कृती आहे. म्हणूनच, भाषा सोडली, तर आपल्या संस्कृतीची नाळदेखील तुटण्याचा धोका आहे. आपली भाषा दुय्यम नक्कीच नाही. तिचा निश्चितच अभिमान बाळगणे गरजेचे आहे.
युवक वर्गाला हँड होल्डिंग, निर्णयस्वातंत्र्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आमच्यासारख्या जगभरातील मराठीजनांकडून महाराष्ट्रातील युवा पिढीला हँडहोल्डिंग करणे नक्कीच गरजेचे आहे. आज जगभर वेगवेगळ्या क्षेत्रात मराठीजन आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातही अनेक दिग्गज आदर्शवत रोल मॉडेल आहेत. महाराष्ट्राबरोबरच या जगभरातील रोल मॉडेलना एकत्र आणून आपल्याला त्याचे व्यासपीठ तयार करता येईल. या मराठीजनांनी आपले अनुभव शेअर केले, तर त्यापासून खूप बोध घेता येतो. युवक पिढीला आम्ही हँडहोल्डिंग नक्कीच करू. पण, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपण व्यावहारिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणे अधिक महत्वाचे आहे. त्यासाठी युवापिढीला निर्णयाचे स्वातंत्र्य द्यावे. केवळ मार्गदर्शनाचे स्पून फीडिंग करायला नको.
श्रींची इच्छा हे आत्मकथनपर मी पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये काही मार्गदर्शन केले नाही, तर फक्त माझ्या वाटचालीचे अनुभवकथन केले. त्या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवाची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोचली. त्याचा खूपच फायदा होतो, असा प्रतिसाद मला मिळतो आहे. युवा पिढीला आपण विचारस्वातंत्र्य दिले आहे. आता त्यांना निर्णयस्वातंत्र देण्याची गरज आहे.
जगात भरारी घेण्यासाठी आपल्या युवा पिढीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. तो आपण निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांची ऊर्जा, हुशारी, बुद्धिमत्ता वादातीत आहे. त्यांना भरारी घेण्यासाठी आपण पोषक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. या मिशनच्या यशासाठी पालकांनी जरा आपला संकुचित, सावध आणि पारंपरिक दृष्टिकोन सोडावा. यशस्वी होण्यासाठी काही धोके हे पत्करावेच लागतात. मात्र, या वाटचालीमध्ये अडखळलेल्यांना दूषणे न देता, त्यांना अडीअडचणीवर मात करून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उभारी देण्याचे ‘हँड होल्डिंग’ आपण नक्कीच करू.
युवा पिढीसाठी करिअरची नवनवीन क्षेत्रे शोधून त्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीला संधी मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी कुटुंब, सरकार, शिक्षणसंस्था अशा सर्वंच स्तरांवर पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रासाठी माझे व्हिजन…
आपल्या महाराष्ट्राने साधलेल्या प्रगतीचा नक्कीच अभिमान आहे. मात्र, आता २.० प्रमाणे अधिक वेगाने भरारी घेण्यासाठी सज्ज व्हा! तंत्रज्ञानाधारित सुविधा गावोगावी पोचविण्यासाठी मिशन मोड प्रकल्प हाती घेणे गरजेचे आहे. हाय स्पीड इंटरनेटसारख्या आधुनिक जगाला साजेशा पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. त्यांचा वेग अधिक वाढवा. त्यावर आधारित गव्हर्नन्स सिस्टिम आपण लागू करीत आहोतच. ही चळवळ आता अधिक व्यापक करणे गरजेचे आहे.
पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच कालसुसंगत अभ्यासक्रम तयार करण्याची मोहीमदेखील स्पीडअप करावी लागणार आहे. त्यावर आधारित नोकरी-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शिक्षणसंस्थांमधून बरेच व्यापक काम करणे आवश्यक आहे. या संदर्भातदेखील शासन आणि खासगी घटकांनी एकत्र येऊन बरेच पायाभूत काम करणे गरजेचे आहे.
देशाचे आर्थिक राजधानी मुंबई आहेच आणि यापुढेही राहील. सरकार, मंत्री आणि प्रशासन खूप चांगले काम करीत आहे. त्याच्या जोडीला जगभरातील मराठीजनांची अनुभवाची शिदोरी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वापरता येईल. त्यासाठी मी पूर्ण सहकार्य करण्यास कायमच उत्सुक आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला शुभेच्छा!
महाराष्ट्र २.० या धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला माझ्या वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा. आमच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या फिलाडेल्फिया येथील कार्यक्रमाला उद्धवजी उपस्थित राहिले होते. त्या वेळी त्यांना अमेरिकेतील मराठीजनांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आताही आम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वतोपरीने सहकार्यास तयार आहोत.
मार्मिकच्या आठवणी अजूनही ताज्या…
मार्मिकचा मी खूप जुना वाचक आहे. पुण्यामध्ये मी राहात असताना १९७० च्या दशकामध्ये आम्ही मार्मिक, ग. वा. बेहेरे यांचे सोबत आवर्जून वाचत असू. किंबहुना, दर आठवड्याला आता मार्मिकमध्ये कोणत्या विषयावर आता लिहिले जाणार, बाळासाहेबांचा कुंचला आता काय जादू करणार, याची उत्सुकता असायची. त्यांचे लेखन खूपच निर्भीड, बोचरे आणि मुद्देसूद असायचे. त्यांची भाषादेखील अगदी मार्मिक असायची. तुम्ही मार्मिकचा ठेवा जपताय आणि डिजिटल माध्यमातून तो जगभरातील मराठीजनांपर्यंत पोचवत आहात, ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. मार्मिकच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अमेरिकेतील सर्व मराठीजनांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा