मराठमोळा खणखणीत अभिनेता शरद केळकर अलीकडे ‘लक्ष्मी’ या चित्रपटात गाजत असतानाच त्याने ‘तान्हाजी’ या आपल्या चित्रपटाच्या वेळची स्क्रीन टेस्टची आठवण इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेयर केली आहे. या सिनेमात शरदने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेसाठी आपली निवड कशी झाली, आपला लुक तेव्हा कसा होता, त्यावेळी आपण काय वस्त्रे परिधान केली होती त्याचा फोटो त्याने शेयर केला आहे. या सिनेमाने प्रेक्षकांची मने तर जिंकली होतीच, पण त्यासोबतच रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. यात अजय देवगणने तान्हाजीची शीर्षक भूमिका केली होती.
मात्र शिवाजी महाराज म्हणून शरद केळकरचीही लोकांनी तारीफ केली होती. शरद या पोस्टमध्ये लिहितो की,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अवतारात पहिल्यांदा येण्याचा अभिमान माझ्यासाठी काही निराळाच होता.
या भूमिकेसाठी शरदने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेहराव केला होता. त्या पेहरावात आल्यानंतरचा अनुभव त्याने या पोस्टच्या निमित्ताने शेयर केला आहे. सध्या ‘लक्ष्मी’ या सिनेमातील शरद केळकरच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे. शरद केळकरने विविध मालिका आणि सिनेमांमधून सिनेविश्वात त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.