गावातला विनोदविषय असलेला भणंग शेखचिल्ली त्या दिवशी गावातल्या गुत्त्यात आला, तेव्हा सगळे त्याच्याकडे वळून पाहू लागले. त्याच्या अंगावर नवेकोरे महागडे कपडे होते. भारीतलं घड्याळ, उंची अत्तरांचा सुगंध, हातात अंगठ्या, ब्रेसलेट, गळ्यात जाड जाड चैनी असा थाट होता. त्याने आत आल्यावर सगळ्यांना त्याच्यातर्फे एकेक क्वार्टर सांगितली आणि गुत्तेवाल्यापुढे गुलाबी नोटांची एक गड्डी ठेवली, तेव्हा तर लोक चाटच पडले…
सगळे त्याच्याभोवती गोळा होऊन विचारू लागले, काय दादा, हा काय चमत्कार झाला? कसा झाला?
शेखचिल्ली म्हणाला, मला रेसमध्ये दहा कोटीचा जॅकपॉट लागला…
एक मित्र म्हणाला, तू तर पक्का ढ गोळा! झाडावर बसून फांदी कोणती कापायची ते कळत नाही दादा तुला आणि रेसमध्ये कोणता घोडा जिंकणार, हे कसं उमगलं?
शेखचिल्ली हसून म्हणाला, गणित भाऊ गणित. मला सलग तीन रात्री एकच स्वप्न पडलं… तिन्ही वेळा स्वप्नात सातचा आकडा दिसला. मी गणित केलं. सात त्रिक चोवीस. दोन अधिक चार सहा. मग सहा नंबरच्या घोड्यावर लावले खिशात होते नव्हते ते सगळे पैसे.
गुत्त्यातले सगळे एकसमयावच्छेदेकरून किंचाळले, अरे पण गधड्या सात त्रिक चोवीस नाही होत, एकवीस होतात!
शेखचिल्ली मिशीला पीळ भरत म्हणाला, तुमचं शिक्षण घाला चुलीत… जॅकपॉट कुणाला लागलाय?!!!