कोरोना प्रतिबंधासाठीची कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारकच आहे. चेन्नईच्या स्वयंसेवकांसोबत झालेली साईड इफेक्टची घटना दुर्दैवीच आहे. मात्र, ही घटना कोविशिल्ड लसीमुळे घडलेली नाही. स्वयंसेवकासोबत झालेल्या प्रकारानंतर सिरम इन्स्टिटय़ूटनेही सहाभूती व्यक्त केलेली आहे.
चाचणीदरम्यान सर्व नियम, मार्गदर्शक सूचना व प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्यात आलेले आहे. स्वयंसेवकाशी झालेली विपरीत परिणामाची घटना कोरोना लसीच्या चाचणीशी संबधित नाही, असे स्पष्ट करीत पुणेस्थित सिरम इन्स्टिटय़ूटने चेन्नईच्या स्वयंसेवकाने केलेले आरोप फेटाळत त्याचा 5 कोटी रुपये नुकसानभरपाईचा दावाही पार फेटाळून लावला आहे.
सिरम इन्स्टिटय़ूटची कोविशिल्ड कोरोना लस घेतलेल्या चेन्नईतील एका स्वयंसेवकाने लसीमुळे न्युरॉलॉजिकल ब्रेकडाऊन (मेंदू आणि शरीरातील नसांचा विकार) आणि विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचा आरोप करत सिरम इन्स्टिटय़ूट आणि अन्य काही जणांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.
तसेच त्यांच्याकडून पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. यासोबतच लसीची चाचणीही थांबवण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, हे आरोप सिरमने फेटाळून लावले आहेत.
स्वयंसेवकाला झालेल्या त्रासाशी लसीचा संबंध नाही
40 वर्षांच्या चेन्नईकर कोरोना चाचणी स्वयंसेवकाने पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहेत. सिरम इन्स्टिटय़ूटला त्यांच्या स्वंयसेवकांच्या वैद्यकीय स्थितीबाबत काळजी आहे.
लसीची चाचणी आणि स्वयंसेवकाची चाचणीनंतरची वैद्यकीय स्थिती यांचा अजिबात संबंध नाही,’ असे स्पष्टीकरण सिरम इन्स्टिटय़ूटकडून याआधीही देण्यात आले होते. या आरोपांमुळे लसीच्या पुढील चाचण्या थांबवण्याचीही गरज नसल्याचे सिरमने म्हटले आहे.
सौजन्य- सामना