मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंदच राहणार आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात असले तरी इतर देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आणि देशातील अन्य राज्यांमधील कोरोनाची स्थिती पाहता सध्या तरी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.
मुंबई विभागातील शाळा सुरू करण्याविषयी शिक्षण विभागाने महापालिका आयुक्तांकडे सादर केलेल्या प्रस्तावावर आज मंगळवारी निर्णय येणे अपेक्षित होते. पूर्वी जारी केलेल्या निर्णयानुसार 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. आता नव्या आदेशानुसार 1 ते 15 जानेवारीपर्यंत मुंबई विभागातील शाळा बंदच राहणार आहेत.
मुंबईतील विदेशी बोर्डाच्या शाळा सुरू
कोरोनामुळे मुंबईतील सर्व शाळा बंद असल्या तरी महापालिकेने वाणिज्य दूतावासांच्या शाळा (इतर देशांतील शिक्षण मंडळाच्या शाळा) सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू करताना कोरोनाविषयीच्या खबरदारीचे तसेच आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षाविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिकेने शाळा व्यवस्थापकांना दिल्या असून या शाळांना राज्यात 23 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नववी ते बारावीच्या शाळांना शालेय शिक्षण विभागाने जारी केलेले सर्व नियमही लागू असणार आहेत.
सध्या तरी मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याचा कोणताही विचार नाही. शाळा सुरू करण्याविषयी शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. येत्या काही दिवसांतील परिस्थिती पाहूनच त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका
सौजन्य- सामना