कोरोनामुळे मागील मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले आहे. शाळा अद्यापही बंद आहेत. परीक्षेला दोन महिने राहिले असताना अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही, यावर मार्ग काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व परीक्षा आणि त्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी शाळा आणि मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवडय़ापूर्वी दहावी आणि बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्राच्या एकूणच परिसरात अजूनही पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्या शाळा आणि त्यातील अभ्यास हा कशाप्रकारे पूर्ण करायचा असा प्रश्न असून यासाठी शालेय शिक्षण विभागाने मध्यम मार्ग काढावा आणि सर्वच परीक्षा आणि त्यांच्या मूल्यमापनाची जबाबदारी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत शाळांवर द्यावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे सचिक प्रशांत रेडीज यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे
सीबीएसई बोर्डाने कोणत्याही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे. शिवाय या मंडळांनी अभ्यासक्रमही मोठय़ा प्रमाणात कमी केला आहे. राज्य शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला असला तरी पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करणे हे शाळा आणि शिक्षकांनासुद्धा मोठे आव्हान आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आली आहे.