गोड सोनाली बेंद्रे आणि हॅण्डसम आमीर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सरफरोश’ हा देशभक्ती जागवणारा सिनेमा बऱ्याच वर्षांपूर्वी खूपच गाजला होता. नसीरुद्दीन शाह यांनीही यात अप्रतिम भूमिका साकारली होती. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मथान यांच्या याच सिनेमाचा सिक्वल बनणार आहे. ‘सरफरोश-2’ हा सिनेमा केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांवर बनवणार असल्याचे नुकतेच मथान यांनी स्पष्ट केले.
‘सरफरोश’ सिनेमामुळेच मथान 1999 साली राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले होते. दिग्दर्शकाच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही कर्तबगारी केली होती. या सिनेमाच्या सिक्वलबाबत बोलताना मथान म्हणतात, या दुसऱ्या भागाची पटकथा मी पाच ते सहा वेळा लिहिली. आता कुठे ती फायनल केली आहे. मी पटकथा लिहितो तेव्हा समीक्षक या सिनेमावर काय म्हणतील असा विचार मी कधीच करत नाही.
एकदा पटकथा लिहिली की पाचेक महिन्यांनी मला त्यात वेगळी कल्पना सुचते. मग मी ती पुन्हा लिहितो. मला वाटतं तुम्ही स्वत:च आपल्या कामाचे खरे समीक्षक असता… मी हा सिनेमा सीआरपीएफ जवान आणि त्यांच्या समस्यांवर बनवणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच स्पाय थ्रिलर सिनेमा असेल असेही ते सांगतात.