जगात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. जवळपास सर्वच कलाकार वेगवेगळ्या सोशल माध्यमांवरून आपल्या चाहत्यांना ख्रिसमस विश करत आहेत. यातले अनेकजण यंदाचा हा सण घरातूनच साजरा करत आहेत, तर काहीजण आपापल्या प्रोजेक्टच्या सेटवरून लोकांना शुभेच्छा संदेश पाठवत आहेत. याच धामधुमीत अभिनेत्री सारा अली खान हिने आपल्या ‘अतरंगी रे’ सिनेमातला सहकलाकार धनुष आणि दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्यासोबत ख्रिसमसच्या दिवशीच काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. त्यासोबतच तिने इन्स्टाग्राम रिल्सवर आपला एक बुमरँग व्हिडियोही टाकला आहे.
या व्हिडीओतही ती धम्माल करण्याच्या मूडमध्ये दिसतेय. तिने सफेद टॉप आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केले आहे. दुसरीकडे ‘रांझना’ स्टार धनुषने लाल आणि सफेद स्कार्फसोबत ऑल-ब्लॅक आऊटफिट घातलेला दिसतोय. ‘अतरंगी रे’ हा सिनेमा आनंद एल. राय दिग्दर्शित करत आहेत. भूषणकुमार, कृष्णकुमार हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. या सिनेमात अक्षयकुमार लीड भूमिकेत आहे. याच सिनेमातले सारा व अक्षयचे फोटो काहीच दिवसांपूर्वी सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते.