अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारीवर संजय गुप्ता यांनी आतापर्यंत किती चित्रपट बनवले असतील त्याला गणतीच नाही. पण त्यांचा प्रत्येक सिनेमा अफलातून झालाय हे कुणीही सांगेल. अंडरवर्ल्ड, त्यातला डॉन, एकमेकांना संपवून डॉन होण्याची प्रत्येकाची धडपड याच सगळ्यावर ते ‘मुंबई सागा’ हा नवा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा येत आहेत.
या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलेय. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांच्या खणखणीत भूमिका पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात गुंड, भाई म्हणून जॉन अब्राहम टिपिकल कपाळावर गंध लावलेला दिसणार आहे, तर इमरान हाश्मी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांसमोर येईल. महेश मांजरेकरांनी अभिनेता म्हणून दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्येही आपली चुणूक दाखवली आहे. मुळात त्यांनी आपल्या दिग्दर्शनातील ‘दी वॉर इन द हिल्स’ या 400 मिनिटांच्या वेबसिरीजमध्ये काय कमाल केली आहे ते वेगळं सांगायला नको.