पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा आपण लहानपणापासून वाचत, ऐकत आलोय. याच थरारक प्रसंगावर लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर ‘जंगजौहर’ हा सिनेमा बनवत असल्याचेही सर्वांना ठाऊक आहे. मुहूर्तापासूनच चर्चेत राहिलेला हा सिनेमा आता ‘पावनखिंड’ या नावाने सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाच्या रूपात ‘शिवराज अष्टका’तील तिसरे पुष्प शिवचरणी अर्पण करण्याचा विडा उचलला आहे. चित्रपटरूपी हे तिसरे पुष्प रसिक दरबारी सादर करायला थोडाच अवधी असताना या चित्रपटाचे नाव आता बदलण्यात आले आहे.
हा चित्रपट नव्या नावासह १० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. अमोल गोळेने छायांकन केले असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजीने दिले आहे. ‘ते फकस्त ६०० व्हते’ असे म्हणत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा प्रेक्षकांना आता ‘पावनखिंड’ या नावाने पहायला मिळणार आहे.