अनेक मुलींच्या मागे मागे फिरणारा, पण तरीही खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट लवकरच ‘गुडबॉय’ या नव्या मराठी वेबसिरीजमधून उलगडणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेना या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन यांनी या वेबसिरीजची निर्मिती केलेली असून लवकरच ती हंगामा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
यात ऋषी सक्सेनासोबतच खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी, अभ्यंग कुवळेकर वगैरेंच्याही प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या वेब मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, तर छायांकन अक्षय राणे यांनी केले आहे. खऱ्या प्रेमाचा शोध घेणाऱ्या ऋषी सक्सेनाबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरे ही वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतील. धमाल कथानक आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही या सिरीजची वैशिष्ट्ये आहेत, असे भूपेंद्रकुमार नंदन यांनी सांगितले.