रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी अर्णब गोस्वामीने बार्पचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ताचा खिसा गरम केला होता. 2017 ते 2018 या काळात अर्णबने पार्थला परदेश दौऱयासाठी सहा हजार डॉलर आणि लाखो रुपये दिले होते. पोलिसांनी पार्थच्या घरातून टॅगह्यूअरचे घडय़ाळ आणि दोन लाख 22 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
टीआरपी प्रकरणात गेल्या आठवडय़ात मुंबई क्राईम ब्रँचने बार्पचे सीईओ पार्थ दासगुप्ताला अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने पार्थला दोन दिवसाची क्राईम ब्रँच कोठडी सुनावली आहे. पार्थच्या चौकशीत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. 2004पासून पार्थ आणि अर्णब हे एकमेकांना ओळखतात. अर्णब गोस्वामीने रिपब्लिक इंग्लिश चॅन्सल सरू केले. पार्थला टीआरपीबाबत माहिती असल्याने अर्णबने त्याची मदत घेतली.
डेटामध्ये फेरफार करून टाइम्स नाऊला दुसऱया क्रमांकावर ढकलून रिपब्लिक टीव्हीला पहिल्या नंबरवर आणले गेले. टीआरपी वाढवण्यासाठी अर्णबने पार्थला 6 वेळा पैसे दिले होते. 2017 मध्ये अर्णबची आणि पार्थची एका हॉटेलमध्ये भेट झाली. पार्थला डेन्मार्प आणि स्वीडनला फिरायला जाण्यासाठी अर्णबने 6 हजार डॉलर दिले. त्यानंतर 2018मध्ये अर्णबने पार्थला काही लाख रुपये दिले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पार्थच्या घरातून टॅगह्यूअरचे एक घडय़ाळ आणि दोन लाख 22 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. तर पोलिसांना काही व्हाट्सअप चॅट्समधील संभाषण हाती लागले आहेत. पार्थच्या घरातून पोलिसांनी एक लॅपटॉप जप्त केला आहे. जप्त केलेला लॅपटॉप तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवल्याचे सीआययूचे प्रभारी निरीक्षक सचिन वाझे यांनी सांगितले. आज क्राईम ब्रँचने रिपब्लिक टीव्हीच्या सीओओ प्रिया मुखर्जीचा जबाब नोंदवला आहे.
सौजन्य- सामना