महानिर्मितीचे राज्यभरात जवळपास आठ हजार मेगावॅटहून अधिक औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्यामध्ये वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळल्यानंतर दररोज जवळपास 30-40 हजार मेट्रिक टन राख बाहेर पडते. या राखेचा सध्या अल्प प्रमाणात सिमेंटमध्ये वापर केला जात आहे. त्याची दखल घेत भविष्यात जास्तीत जास्त राखेचा वापर सिमेंटनिर्मिती, रस्ते बांधणी, पूल बांधणीसाठी करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील राखेच्या व्यवस्थापनाचा आढावा आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला. वीज केंद्रातून मोठय़ा प्रमाणात राख बाहेर पडत आहे. ते सिमेंट कंपन्यांना मोफत देण्याएवजी त्याची विक्री करून महानिर्मितीला आर्थिक उत्पन्न मिळवता येईल असेही राऊत यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर रस्ता, पूल बांधणी करताना भर म्हणून सध्या मुरुम वापरला जातो. त्याऐवजी राखेचा तंत्रशुद्धपणे कसा वापर करता येईल, त्याची किंमत, क्षमता, वाहतूक खर्च आदीबाबत अभ्यास करून त्याची उपयुक्तता पटवून द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.