एवढी साप्ताहिकं वाचूनही ‘मार्मिक’ कधी येतोय त्यावर डोळा असायचा. २०० शब्द जे पटकन सांगणार नाहीत ते एक व्यंगचित्र सांगत असे. आणि बाळासाहेबांसारखं रेखाटन असेल, बिनधास्तपणा असेल आणि रिडींग बिटविन द लाईनचं कौशल्य असेल तर ते अख्खा अग्रलेखसुद्धा एका चित्रातून मांडू शकत. दुसरं म्हणजे तुमच्या मनात होतं तेच एखादा व्यंगचित्रकार व्यक्त करून तुम्हाला खुदकन हसवतो, तेव्हा ते चित्र, ते साप्ताहिक आपलं वाटतं. त्या काळात ‘मार्मिक’बद्दल वाटणारा आपलेपणा हा या दोन गोष्टीतून आला होता.
‘मार्मिक’ या साप्ताहिकचं नाव घेतलं की माझ्या डोळ्यासमोर मी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये येतो.
तो १९६७ चा काळ.
मी आणि काही मित्र आम्ही हिंदू कॉलनीतल्या किंग जॉर्ज शाळेतून घरी चालत यायचो. माझ्याबरोबर माझा मित्र प्रविण असायचा. मी शिवाजी पार्कला रहायचो. तो पुढे शारदाश्रममध्ये रहायचा. आठवड्यातून एकदा तरी आम्ही रानडे रोड, केळुस्कर रोडच्या नाक्यावरच्या वर्तमानपत्र विकणार्या स्टॉलवर धडकायचो. प्रविण ‘मार्मिक’ विकत घ्यायचा. तिथे तो वाचायचा. मग माझ्याकडे द्यायचा. आणि तो त्याच्या घरी जायचा, मी माझ्या घरी. तो घरी ‘मार्मिक’, घेऊन जात नसे ही गोष्ट अत्यंत ठळकपणे माझ्या मनावर बिंबलेली आहे. त्याचे वडील एका आघाडीच्या दैनिकाचे संपादक होते. कदाचित त्यांना मुलाने ‘मार्मिक’ वाचलेला आवडत नसावा.
तो माझा मित्र आजही राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक आहे. त्याचं प्रचंड वाचन आहे. पुढे तो मार्क्सवादी झाला. समाजवादी चळवळीत त्याने भाग घेतला. आणि आता हे सर्वच वाद सामान्य माणसाचं भलं करायला अपयशी ठरलेत या टप्प्यावर तो आहे. पण एका जमान्यात ‘मार्मिक’ने त्याला अशी भुरळ घातली होती. ही भुरळ सर्वच तरुणांना घातली होती. ती भुरळ मध्यमवयातील मंडळींना सुद्धा घातली होती. आणि मध्यमवर्गासाठी तर ‘मार्मिक’मधली व्यंगचित्र हे त्यांच्याच मनातील विचार होते.
माझे वडील एका मोठ्या जाहिरातीच्या कंपनीत काम करत. ते आठवड्यातून एकदा घरी अनेक साप्ताहिकं आणत. ते शुक्रवारी घरी आले की त्यांची बॅग साप्ताहिकांनी भरलेली असायची. आणि त्यात काय असायचं? इलस्ट्रेटेड विकली, फिल्म फेअर, ब्लिटझ्, करंट, ईव्हज विकली, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली वगैरे वगैरे. आणि हो त्यात एक शंकर्स विकली असे, पूर्णपणे व्यंगचित्राला वाहिलेलं ते साप्ताहिक होतं. केशव शंकर पिलाई नावाच्या व्यंगचित्रकाराने ते सुरू केलं होतं. १९४८ ते ७५ पर्यंत त्यांनी ते चालवलं. आणीबाणीत ते बंद केलं कारण सरकारला कदाचित व्यंगचित्राचे आघात परवडणारे नव्हते. पण गंमत पहा, त्याच आणीबाणीत १९७६ साली त्यांना पद्मविभूषण हा किताब मिळाला.
‘मार्मिक’ हे तसंच व्यंगचित्र साप्ताहिक होतं. बाळ केशव ठाकरे नावाच्या एका व्यंगचित्रकाराने सुरु केलेलं. व्यक्तिशः मला बाळासाहेबांची व्यंगचित्रांची शैली आवडायची. एक लक्षात ठेवा की त्या काळात आम्ही सर्व ती साप्ताहिकं वाचून काढत होतो. कारण ना टीव्ही होता, ना सोशल मीडिया.
एवढी साप्ताहिकं वाचूनही ‘मार्मिक’ कधी येतोय त्यावर डोळा असायचा. हे फार महत्त्वाचं आहे. त्याची दोन कारणं होती. एक म्हणजे लिखित शब्दापेक्षा चित्र, फोटो हे जास्त प्रभावी असतात. वर्तमानपत्र किंवा मासिक, पुस्तक उघडल्यावर आपलं पहिलं लक्ष हे चित्रावर जातं किंवा फोटोवर जातं. मग लेख वगैरे येतात.
एकेकाळी घरी ‘टाइम्स’ आला (हल्ली मी टाइम्स घेणं सोडून दिलंय.) की पहिलं लक्ष लक्ष्मणच्या व्यंगचित्रावर जायचं. तसंच मार्मिकचं होतं. २०० शब्द जे पटकन सांगणार नाहीत ते एक व्यंगचित्र सांगत असे. आणि बाळासाहेबांसारखं रेखाटन असेल, बिनधास्तपणा असेल आणि रिडींग बिटविन द लाईनचं कौशल्य असेल तर ते अख्खा अग्रलेखसुद्धा एका चित्रातून मांडू शकत. दुसरं म्हणजे तुमच्या मनात होतं तेच एखादा व्यंगचित्रकार व्यक्त करून तुम्हाला खुदकन हसवतो, तेव्हा ते चित्र, ते साप्ताहिक आपलं वाटतं. त्या काळात ‘मार्मिक’बद्दल वाटणारा आपलेपणा हा या दोन गोष्टीतून आला होता.
गंमत पहा, त्यावेळी आचार्य अत्रे हे प्रचंड मोठं वादळी व्यक्तिमत्त्व होतं. मी सोळा, सतरा वर्षांचा. त्यांचे किंचित चावट विनोद, कुणावरही बेधडक हल्ला करायची वृत्ती आणि त्याचबरोबर त्यांचं उच्च दर्जाचं साहित्य, त्यांचं वक्तृत्व, यामुळे तारुण्याच्या उंबरठ्यावरची आणि उंबरठा ओलांडलेली मुलं, मुली त्यांच्यावर लुब्ध होते. त्यांच्यासमोर उभे ठाकले होते बाळासाहेब. त्यावेळी खरं तर ते बाळासाहेब झाले नव्हते. ते बाळ ठाकरे होते. मार्मिकचे संपादक, प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव. अत्रे जेव्हा आक्रमकपणे लिहीत तेव्हा ते नुसती आग ओकत. काहीही विधिनिषेध पाळत नसत. अत्रे – माटे, अत्रे – फडके, अत्रे – तटणीस (आलमगीर या साप्ताहिकाचे संपादक) हे वाद गाजले होते. वाद साहित्यातून सुरू होत आणि ते व्यक्तिगत स्तरावर येऊन थांबत. पण या वादामध्ये दोन लेखण्या तलवारी बनत.
अत्रे – ठाकरे वादात तलवारी वेगळ्या होत्या. एका ठिकाणी लेखणी तलवार होती, दुसरीकडे कुंचला. कुंचला प्रभावी ठरला. कारण एक छोटं व्यंगचित्र लेखाला पुरून उरायचं. मग त्या लेखामध्ये कितीही आगपाखड केलेली असो. त्यावेळी अत्रे नामोहरम झालेले मी पहिल्यांदा पाहिलं.
शिवसेनेसाठी हाच कुंचला सुरवातीला अत्यंत महत्त्वाचा ठरला. मार्मिकवर एक शेर लिहिलेला असायचा, ‘खिचो ना कमान को ना तलवार निकालो, जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो।’ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपून महाराष्ट्र वेगळा झाला. मुंबई महाराष्ट्रात आली पण मराठी माणसाचे हाल कमी झाले नाहीत. नोकर्या मिळेनात. इतरांची मराठी माणसाकडे पहायची वृत्ती ही, ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ अशीच होती. त्यावेळी इतर कुठलीही तलवार हातात न घेता बाळासाहेबांनी कुंचला हातात घेऊन साप्ताहिक काढलं. ‘वाचा आणि थंड बसा’ या सदराखाली मराठी माणसावरचे अन्याय वेशीवर टांगले. आणि बघता बघता एक चळवळ आणि एक संघटना उभी राहिली. तरुणांची मनं कापरासारखी होतीच. कुणीतरी त्यांना पेटवायची गरज होती. ‘मार्मिक’चे अग्रलेख आणि व्यंगचित्र यांनी ती पेटवली. ते कापूर पेटवले गेले. आणि एक अशी संघटना उभी राहिली की ५३ वर्ष आजही उभी आहे. ‘मार्मिक’ या छोट्या रोपट्याला आलेलं हे प्रचंड मोठं फळ आहे.
मला १९६७ ची निवडणूक आठवते. अत्रे, डांगे, मेनन वगैरे राजकीयदृष्ट्या प्रचंड मोठ्या असलेल्या व्यक्तींना पाडण्यासाठी बाळासाहेबांनी चंग बांधला होता. त्यावेळची त्यांची व्यंगचित्र मला आजही आठवतात.
अत्रेंच्या पार्श्वभागावर एक जखमेवर लावतात अशी पट्टी ते दाखवायचे. ती पट्टी आणि डुक्कर सदृश्य चेहरा खूप बोलून जायचा. पण त्याच बाळासाहेबांनी अत्रे गेल्यानंतर ‘असा माणूस होणे नाही’ हा लिहिलेला अग्रलेख आणि अत्रेंचं काढलेलं एक व्यंगचित्र त्यावेळीही मनाला चटका लावून गेलं होतं आणि आठवलं की आजही तो चटका जाणवतो. १९६७ च्या निवडणुकीमध्ये अत्रे पडले, मेनन पडले, डांगे फार थोड्या मतांनी निवडून आले. ही जी मंडळी पडली होती या मंडळींना पाडण्यात ‘मार्मिक’चा हात खूप मोठा होता असं मला वाटतं.
त्याकाळामध्ये ‘मार्मिक’मधल्या तीन, चार गोष्टी मी आवडीने वाचत असे. एक म्हणजे वरचं मुखपृष्ठ आणि आतली व्यंगचित्र. एखाद्या व्यक्तीचं शारीरिक व्यंगसुद्धा म्हणजे मोठं नाक किंवा चेहरा किंवा आणखीन काही बाळासाहेब फार सुंदर दाखवत. आजही इंदिरा गांधी आठवल्या ना की मला बाळासाहेबांचं व्यंगचित्र आठवतं. त्यातलं ते त्यांचं नाक आठवतं. आमचा लाडका क्रिकेटपटू रमाकांत देसाई यांचं त्यांनी एक व्यंगचित्र काढलं होतं. आणि त्याखाली लिहलं होतं ‘डायनामाईट्स आर पॅकड् इन स्मॉल पॅकेट्स.’ किती सुंदर चित्र होतं ते. आजही मला असं वाटतं की रमाकांतच्या घरात ते लटकवलेलं आहे. रमाकांतवर बाळासाहेबांचं प्रेम होतं. रमाकांतचे इतर फोटो बाजूला आणि ते व्यंगचित्र बाजूला, अशी परिस्थिती आहे.
तर मी काय सांगत होतो, व्यंगचित्र पाहून झालं की मग मी अग्रलेख वाचायचो. प्रबोधनकारांकडून आलेली बाळासाहेबांची रोखठोक ठाकरी भाषा ही इतरांच्या शैलीपेक्षा वेगळी वाटायची. त्याच ‘मार्मिक’मध्ये ‘बोरीबंदरचा बेरड’ म्हणून एक सदर होतं. मला असं वाटतं की ते प्रमोद नवलकर लिहीत. ते प्रमोद नवलकर स्टाईलमध्ये नसे, बरचसं अग्रेसिव्ह असे. पण असे मस्त. आणि मग शेवटी मिटक्या मारत मी श्रीकांत ठाकरेंचं ‘सिने प्रिक्षान’ वाचायचो. शुद्ध निषाद या नावाने ते लिहायचे. फार फार धमाल यायची. एकेका सिनेमाची ते सालटं काढत तेव्हा अगदी हेच आपल्या मनात होतं असं वाटे. आपल्याला जे वाटलं ते त्यांनी अगदी मस्त मांडलं. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता मांडलं, असं वाटत असे. ‘दिल दिया दर्द दिया’ या सिनेमावर लिहिताना त्यांनी ‘दिल भी दिया और दर्द भी दिया’ असं फार सुंदर लिहिलं होतं.
एकंदरीतच ‘मार्मिक’ हातात घेतला की कधी संपायचा कळायचंच नाही. ‘मार्मिक’ हा डेझर्टसारखा असायचा. इतर साप्ताहिकं वाचताना पोट भरायचं. पण तरीही पोटात एक जागा आम्ही डेझर्टसाठी ठेवायचो. आणि ते डेझर्ट खाऊन झाल्यानंतरच तृप्तीचा ढेकर द्यायचो. ते डेझर्ट अर्थातच ‘मार्मिक’ होतं. आता काळ बदलला, साप्ताहिकं गेली, मोठी मोठी साप्ताहिकं कोसळली. ‘मार्मिक’ची ज्योत ही छोटी का होईना तेवतच होती. पण आता ती पुन्हा मोठी होणार, नवं तेल ओतलं जाणार ही गोष्ट कळल्यानंतर प्रचंड आनंद झाला. कुठेतरी जुन्या भावविश्वाशी मी जोडलो गेलो.
या नव्या स्वरूपासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा!