ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. ठाणे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची शेवटची गाजलेली भूमिका ही छोट्या पडद्यावरील अगंबाई सासुबाईमधली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रवी पटवर्धन यांचा जन्म 06 सप्टेंबर 1937 रोजी झाला. बालगंधर्वांच्या अध्यक्षतेखालील 1944 साली झालेल्या नाट्यमहोत्सवात वयाच्या साडे सहाव्या वर्षी रवी पटवर्धनांनी पहिल्यांदा रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर ते सातत्याने वेगवेगळ्या चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या. मात्र, असं असूनही त्यांनी नाटकात मात्र विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या.
कथा कोणाची व्यथा कुणाला, प्रपंच करावा नेटका, हृदयस्वामिनी, बेकेट, मुद्राराक्षस, कौंतेय, आनंद, वीज म्हणाली धरतीला, विषवृक्षाची छाया, मला काही सांगायचंय, तुघलक, अपराध मीच केला ही त्यांची काही गाजलेली नाटके. त्यांनी आतापर्यंत 200 हून अधिक चित्रपट आणि दीडशेहून अधिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.
1974 साली आलेल्या आरण्यक या नाटकाचं पुनरुज्जीवन काही महिन्यांपूर्वी झालं. त्यातही वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी तीच धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. संस्कृत भाषेवर प्रभृत्व असलेल्या पटवर्धन यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले होते. शृंगेरी मठातर्फे घेतलेल्या पाठांतर परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाले होते.
सौजन्य- सामना