शाळा हे मुलांचे दुसरे घर आहे. गुणवत्तापूर्ण आणि समान शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर शैक्षणिक करार करून त्यांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून त्याचा स्वीकार करण्यासही सुरुवात व्हायला हवी अशी भूमिका पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मांडली.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृती आराखडय़ातील शाश्वत विकासाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात प्रथम शिक्षण विभाग व पाणी पुरवठा विभागाने केलेल्या प्रगतीबाबतचा आढावा घेणारी बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित केली होती. या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहेही उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, करीअर, योग्यता चाचणी याचे समुपदेशन उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे असून शाश्वत विकासाकडे लक्ष देऊन नवनवीन प्रयोग राबविले पाहिजेत.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या, गरिबी निर्मूलन करणे, भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे, शाश्वत शेतीला प्राधान्य देणे, आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्र शिक्षणचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता व पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी त्यांच्या विभागाचे सादरीकरण केले.
सौजन्य : दैनिक सामना