एका मालिकेत अभिनेत्रीला खलनायकी काम करावे लागले तर तिच्यावर तसाच ठपका पडतो. आता हेच पाहा ना… ‘तुला पाहते रे’ मालिकेत सोनिया ही निगेटीव्ह भूमिका यशस्वीपणे साकारल्यावर अभिनेत्री पूर्णिमा डे हिला ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या सत्रात व्हॅम्पचीच भूमिका मिळाली. ही मालिका नुकतीच सुरू झाली असून पूर्णिमाचा बेधडकपणा लोकांना खूप आवडतोय असं दिसतंय. मुळातच या मालिकेची प्रेक्षकांना ओढ होती. त्यात मालिकेच्या कॅम्पेनमुळे उत्सुकता आणखी वाढली. वास्तविक पूर्णिमा ही केवळ अभिनेत्रीच नाहीये… ती चांगली गायिका आणि उत्तम डायटिशियनही आहे. इन्स्टाग्रामवर नुकताच तिने या मालिकेतील आपल्या भूमिकेचा प्रोमो पोस्ट केलाय. त्याखाली पोस्टमध्ये ती म्हणते, “पुन्हा येतेय तुम्हा सर्वांच्या भेटीस… एका नव्या रुपात… एका नव्या भूमिकेत… ‘रात्रीस खेळ चाले-३’ या लोकप्रिय मालिकेतून… तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच असुदेत”. लोकांनाही पूर्णिमा आता पुढे खलनायकीचे कसे रंग दाखवते त्याची उत्सुकता आहेच.