फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन डेचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘प्रीतम’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर नुकतेच दाखल झाले आहे. हा सिनेमा १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. ‘विझार्ड प्रोडक्शन’च्या माध्यमातून जाहिराती बनवणाऱ्या सिजो रॉकी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
प्रेमाचा अनुभव हा प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा असतो. अशाच वेगळ्या प्रेमाची अनुभूती या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी चमकणार आहे. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आबा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर यांच्याही भूमिका आहेत.
या सिनेमातील शंकर महादेवन यांच्या आवाजातील ‘तुझ्या रूपाचं चांदण सभोती’ हे प्रेमगीत नुकतेच १४ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाची कथा सुजित कुरूप यांनी लिहिली असून पटकथा-संवाद गणेश पंडित यांचे आहेत. गीते गुरु ठाकूर यांची, तर पार्श्वसंगीत विजय गावंडे यांचे असून आहे.