काम आपल्या आवडीचे असले तर ते करायला मजा येते आणि ते झटपटरीत्या चांगलेही पार पडते. आता हेच पाहा ना… अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लवकरच ‘छुमंतर’ या आगामी सिनेमात दिसणार आहे. तिने आपल्या या सिनेमाच्या डबिंगला नुकतीच सुरुवात केली. तशी माहिती देणारा एक व्हिडीओही तिने इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर चाहत्यांसाठी शेयर केला आहे.
या पोस्टमध्येच तिने डबिंग हे आपलं सगळ्यात आवडतं काम असल्याचंही म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. प्रार्थनानेही अलीकडेच या सिनेमाचं आपलं राहिलेलं शूटिंग पूर्ण केलं आहे. या पोस्टमधल्या कॅप्शनमध्ये ती गमतीने म्हणते, ‘इट्स डबिंग टाईम… फिल्ममेकिंगमधील हा माझा सगळ्यात आवडता भाग आहे,’ असंही ती पुढे स्पष्ट करते. समीर जोशी यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये बनलेला आहे.
या सिनेमात प्रार्थना बेहेरेसह रिंकू राजगुरु, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी झळकणार आहेत. बालकलाकार श्रीनिवास पोकळे देखील या सिनेमात आहे. या सिनेमाच्या निमित्ताने या कलाकारांनी लंडनवारी करून सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळतील.