-टिक्कोजीराव
□ प्रताप सरनाईक हे कोणी साधू संत नाहीत.-नारायण राणे
■ बोला, कुडाळ-कणकवलीनिवासी संतशिरोमणी श्री कोंबडेश्वर महाराज की जय!
□ शरद पवार छोटं राजकारण करतात.-चंद्रकांत पाटील
■ माणसाने आपली लेव्हल पाहून थुंकावं, लेव्हलच्या वर थुंकायला गेलं की आपलंच तोंड बरबटतं.
□ आकड्यांची जुळवाजुळव होते आहे. पुढील तीन महिन्यांत भाजपचं सरकार स्थापन होईल.
– रावसाहेब दानवे
■ होराभूषण दानवे गुरुजी इकडे ही भविष्यवाणी वर्तवत होते तेव्हा तिकडे खासदार जयसिंगराव गायकवाडांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली… छान जुळवाजुळव चाललीये आकड्यांची!
□ पुन्हा लॉकडाउन नकोच! -वैद्यकीय तज्ज्ञांचे आग्रही मत!
■ टाळेबंदीत स्वयंपाकपाणी-धुणीभांडी करून जीव मेटाकुटीला आलेल्या गृहिणींचाही दुजोरा असणार तज्ज्ञांच्या मताला!
□ मध्यरात्रीच्या ‘त्या’ शपथविधीच्या बाबतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात.
■ मामुसाहेब, काही चुकाच अशा असतात की त्या विसरायला जाल तेवढ्या आठवत राहतात आणि टोचत राहतात… संवेदनशीलता असली तर.
□ कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी केलेले नियम मोडण्यात मुंबईकर आघाडीवर; ५५ हजारांवर गुन्हे दाखल!
■ अरे भैया, कोरोना से डरो ना! बिना मास्क घूमने का, किसीको भी खेटने का अडाणीपणा मत करो ना!
□ खारे पाणी होणार गोडे, मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी मनोरीमध्ये १६०० कोटींचा प्रकल्प!
■ इथल्या पाण्याचा सगळ्यात आधी राजभवनात पुरवठा करा आणि तिथला ‘खारटपणा’ आणि ‘आंबटपणा’ कमी करा!
□ वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर भाजप आंदोलन करणार!
■ लगेहाथ गेल्या आपल्या सत्ताकाळात बिलांची थकबाकी कशी वाढली, तेही शोधून काढा आणि त्याविरोधातही आंदोलन कराष्ठ लग्नात मुंज होऊन जाईल.
□ चीनने भूतानमध्ये वसवलेल्या गावाबद्दल पंतप्रधान मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल.
■ अजून त्यांनी लडाखमध्ये गमावलेल्या भूप्रदेशाबद्दल तोंड उघडलेले नाही आणि तुम्ही भूतानबद्दल विचारताय?
□ मंगळावरही आला होता महापूर – संशोधकांचा दावा!
■ तिथेही भाजपचे मंत्री पूरपर्यटनासाठी गेले होते का? नाहीतर तिथली जीवसृष्टी नष्ट झाली कशी?
□ आंध्र प्रदेशात गुंटूर येथे शल्यविशारदांना ३५ वर्षांच्या तरुणाला बिग बॉस दाखवत त्याच्यावर केली ओपन ब्रेन सर्जरी!
■ त्याला अर्णब गोस्वामीचा कार्यक्रम दाखवत मेंदू काढून घेतला असता तरी पत्ता लागला नसता!
□ सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबात कलह आणि संशयात वाढ!
■ सोशल मीडिया टाळून नेहमीच्या मीडियाकडे वळावं तर तिथेही अर्णव आणि अंजना छाप गोदी मीडियाचीच च्याव च्याव! जाये तो जाये कहाँ?