तुम्हा दोघांच्या रेखाटणांत विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी. दोन रेषांत तुम्ही मी – मी म्हणवणार्याला लोळवू शकता. शंभर शब्दांनी जे साधणार नाही, ते तुम्ही ब्रशाच्या एका फटकार्याने निभावून नेता. त्यातून चित्रकला ही सार्या डोळस मानवांना कळणारी भाषा. भाषाभेदाचे अडसर तुमच्या आड येत नाहीत. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचे सामर्थ्य मोठे; पण सामर्थ्य जितके मोठे, तितके ते किती बेताने वापरावे, याची जबाबदारीही मोठी.
(१४ ऑगस्ट १९६४ वरळी, मुंबई १८)
प्रिय बाळ आणि श्रीकांत,
तुम्हा दोघांपैकी कुणाच्याही हातात सापडलो असतो तर आजच्या ‘मार्मिक’च्या वाढदिवसाला मोठ्या आनंदाने अध्यक्षीय पगडी घालून बसलो असतो. तो योग हुकल्याचे मला खरोखरीच दु:ख होत आहे. दुसर्या एका कार्यक्रमाची सुपारी आधीच घेतल्यामुळे येता येत नाही. म्हणून या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी तुम्हाला ‘मार्मिक’ला, श्री. द. पां. खांबेटे आदी करोन तुमच्या समस्त सहकारी मंडळींना ‘आयुष्यमान व्हा – यशस्वी व्हा’ असा आशीर्वाद देतो. अध्यक्ष म्हणून जे चार शब्द सांगितले असते, ते पत्रातूनच सांगतो. या शब्दांना थोडा वडीलकीचा सूर लागला असला, तर रागावू नका. तो सूर थोडासा अपरिहार्य आहे. कारण आजही तुम्ही दोघे जण माझ्या डोळ्यांपुढे येता ते आपापली दप्तरे आणि अर्ध्या चड्ड्या सावरीत शाळेत येणारे दोन चुणचुणीत आणि काहीसे खट्याळ विद्यार्थी म्हणूनच.
बाळने शाळेची हस्तलिखित मासिके सजवायची आणि श्रीकांतने व्हायोलिन वाजवून गॅदरिंगमध्ये टाळ्या मिळवायच्या, हे तुमचे पराक्रम तुमच्या चिमुकल्या वयात मी पाहिले आहेत. तुमचे पाय पाळण्यात कसे दिसत होते, ते तुमचे वडील व मातोश्री सांगू शकतील, पण तुम्हां दोघांनीही हात दाखवायला फार लहानपणी सुरुवात केली होती, हे मी ठामपणाने सांगू शकतो.
शाळेतल्या हस्तलिखितांसाठी काढलेल्या चित्रांची रेषादेखील आजच्या तुमच्या चित्रांतल्या रेषेइतकीच जोरदार आणि वळणदार होती, हे मला स्पष्टपणाने आठवते. कुठल्याही कलेतला का असेना ‘झरा मूळचाचि खरा’ असावा लागतो, तरच तो टिकतो.
उदाहरणच द्यायचे तर मार्मिकमधून येणारे तीर्थस्वरूप दादांचे आत्मचरित्रच पाहा. त्यांनी ऐन जवानीची वेस ओलांडल्याला कित्येक वर्षे लोटली, पण जन्माला येतानाच नसानसांतून वाहणारा त्वेष आजही टिकून राहिला आहे. अशा वेळी वयाचा हिशेब गणिताची मर्यादा सोडून करावा लागतो. अन्याय दिसला की तारुण्यातला हा तानाजी वार्धक्यात शेलारमामासारखा उठतो आणि स्वत:ला उदयभानू म्हणवणारे ते चिमटीत चिरडण्याच्या लायकीचे काजवे आहेत हे दाखवून जातो; आणि म्हणूनच वृत्तपत्रव्यवसायातच काय पण सर्वत्रच प्रलोभनकारांचा सुळसुळाट झालेल्या या अव-काळात हा प्रबोधनकार आजही निराळा उठून दिसतो.
ती सदैव धगधगणारी छाती आणि तिची स्पंदने व्यक्त करणारी प्रतिभा हे देणे ते येतानाच घेऊन आले आहेत. त्या प्रबोधनकारांचे नाव तुम्हाला लावावयाचे आहे आणि प्रामाणिक पत्रकारांची जात तुम्हाला सांगावयाची आहे. हे व्रत खडतर आहे.
आपल्या हातून या व्रताचे पालन किती काटेकोरपणाने होत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याचा आजचा हा दिवस आहे. सुदैवाने असले निर्दय आत्मपरीक्षण करायला लागणारी विनोदबुद्धी तुम्हांला उपजत मिळाली आहे. निर्मळ विनोदबुद्धी हे देवाच्या देण्यातले एक ठेवणीचे देणे आहे. मत्सर, पूर्वग्रह क्षुद्रता, वैयक्तिक हेवेदावे असल्या संकुचित आणि स्वत:लाच दु:खी करणार्या भावनांपासून या देण्यामुळे माणूस दूर राहतो, आणि म्हणूनच निर्माण विनोदाचा उपयोग जेव्हा शस्त्र म्हणून करायचा, तेव्हा व्यक्तीचा द्वेष न राहता, वृत्तीतला दोष दाखवणे हे मुख्य कर्तव्य राहाते आणि जेव्हा व्यक्तिद्वेष नसतो, तेव्हाच निर्भयता येते. तोंड चुकवून पळावे लागत नाही किंवा स्वत:च्या क्षुद्र लिखाणाचे त्याहूनही दुबळे असे समर्थन करीत बसण्याची नामुष्की स्वीकारावी लागत नाही. सभ्यतेचा धर्म सोडून वर्म हुडकीत बसणे, हे अत्यंत क्षुद्र मनाचे लक्षण आहे. इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्रे काढून दोषदिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाराला इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सभ्य सीमारेषा कुठली, त्याचे तारतम्य हवे. घाव असा हवा की, मरणाऱ्याने मरतामरता मारणाराऱ्याचा हात अभिनंदनासाठी धरावा. शेतातले काटे काढताना, धान्याची धाटे मोडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. व्यंगचित्रकाराला अव्यंगाचे स्वरूप नीट पारखता आले पाहिजे. व्यंगचित्राने प्रथम हसवले पाहिजे. थट्टेमागे आकस आला, विनोदात कुचाळी आली की ते व्यंगचित्र निर्मळ पाण्यात रंग न कालवता गटारगंगेच्या पाण्याने काढल्याची घाण येते. उत्साहाच्या आणि गंमत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडण्याच्या भरात आपण सर्वांच्या हातून मर्यादांचे उल्लंघन होते.
विनोदाच्या भरात मी स्वत:देखील काही व्यक्तीवर ओरखडे काढल्याची जाणीव मला स्वत:ला त्रास देत असते. सुदैवाने तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत. त्यांच्या स्वत:च्या हातून लेखनात मर्यादांचे जे उल्लंघन झाले असेल, ते तुम्हाला खिलाडूपणाने सांगण्याचे धैर्य त्यांना आहे. तुमचे भाग्य म्हणून तुम्हांला साक्षात जन्मदाताच गुरू म्हणून लाभला; पण गुरू जितका समर्थ, तितकी शिष्याची जबाबदारी अधिक. दुर्दैवाने काळ मोठा कठीण आला आहे. संवेदनशील मन असणे, हे पाप ठरते आहे. प्रत्येक आघाडीवर हार खावी लागत आहे. सत्ताधीशांच्या आणि मत्ताधीशांच्या बकासुरी भुकेपुढे प्रजा हैराण झाली आहे. निर्बुद्धांच्या मुजोरीपेक्षाही बुद्धिमंतांची लाचारी पाहून विलक्षण उदासीनता येते आहे. सदाचारदेखील समित्या बनवून करायची पाळी आली आहे. पत्रकार आणि चित्रकार म्हणून तुमच्या सार्या शक्तींना आव्हान देणारा हा काळ आहे.
दुर्दैवाने हे आव्हान स्वीकारणारी माणसे आजकाल फार थोडी आढळतात. अशावेळी समाजातल्या दंभावर कुंचल्याचे फटकारे ओढणारे तुमच्यासारखे लवांकुश पाहिले की उदंड वाटते. मी सुरुवातीला सांगितलेल्या आपुलकीपोटी मला कदाचित चारचौघांपेक्षा अधिकच उदंड वाटत असेल.
‘मार्मिक’मधले माझे दुसरे आवडते सदर म्हणजे, सिने-परीक्षण. वास्तविक सिनेमा हे तर नियतकालिकांचे ‘डोंगरे बालामृत’ आहे. त्यांच्याकडून मिळणार्या जाहिरातींवर नियतकालिके बाळसे धरतात. त्या भूगंधर्वनगरीतल्या यक्षयक्षिणींना आणि त्यांच्या कुबेरांना प्रसन्न ठेवण्याची अहमहमिका लागलेली दिसते. मराठी भाषेत तर आता नवी विशेषणे निर्माण करण्याची वेळ आली आहे. महान शब्द केव्हाच लहान झाला. कलामहर्षी तर बाबूलनाथच्या पायरीवरच बैराग्याइतके वाढले आहेत. अभिनयाचे सम्राट आणि सम्राज्ञी वृत्तपत्रीय स्तंभास्तंभांना टेकून उभ्या आहेत. अशावेळी बोलपटांतले कचकडे उघडे करून दाखवणे हे किती अव्यवहार्य धोरण, पण तुम्ही ते पाळले आहे, याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींशी तुलना केल्यावर उणेपण वाटू नये, असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आहेत. आवश्यक निर्भयता आहे. रेखाटणांत विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी. दोन रेषांत तुम्ही मी – मी म्हणवणार्याला लोळवू शकता. शंभर शब्दांनी जे साधणार नाही, ते तुम्ही ब्रशाच्या एका फटकार्याने निभावून नेता. त्यातून चित्रकला ही सार्या डोळस मानवांना कळणारी भाषा. भाषाभेदाचे अडसर तुमच्या आड येत नाहीत. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचे सामर्थ्य मोठे; पण सामर्थ्य जितके मोठे, तितके ते किती बेताने वापरावे, याची जबाबदारीही मोठी. शिवाय मराठीतून असे हे सचित्र साप्ताहिक चालवायचे म्हणजे खर्चाची जबाबदारी मोठी. ब्लॉकचा खर्चच किती होत असेल. हे तुम्हांला कसे काय परवडते, याची मला चिंता वाटते. इतके सुंदर व्यंगचित्रप्रधान साप्ताहिक अन्य भारतीय भाषांमध्ये नाही, ही गोष्ट मराठी माणूस म्हणून मला अभिमानाची वाटते. हे सर्व पेलताना विचारस्वातंत्र्य अबाधित ठेवून साप्ताहिक चालवायचे, हे काम महाकर्मकठीण आहे. जाहिराती आवश्यक असतात हे खरे, पण त्यात ओशाळेपणा येण्याचा संभव असतो. तो टाळून हा खर्चाचा बोजा डोक्यावर घेऊन चालणे, ही तारेवरची कसरत आहे. या कसोटीला तुम्ही सदैव उतराल, असा विश्वास मला आहे.
पु. ल. देशपांडे