एका विशिष्ट क्षेत्रात असलेल्या लोकांचे भाऊ, बहीण, मुलं, मुलीही त्याच क्षेत्रात येतात. याला घराणेशाही म्हणत हिणवले तरी ते नकळत होऊनच जाते. आता हेच पाहा ना… अभिनेत्री सुश्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन हाही आता मनोरंजन विश्वात आला आहे. उल्लू या ओटीटी माध्यमावर लवकरच सुरू होणार्या ‘पेशावर’ या वेबसिरीजमध्ये तो देव राज नावाची एका आर्मी ऑफिसरची भूमिका करतोय. वास्तव जीवनात दहशतवाद्यांनी घडवून आणतात तशा टेरर अटॅकवर ही वेबसिरीज बेतलेली असून यातही पेशावरमध्ये एका शाळेवर अतिरेकी बॉम्बहल्ला करतात. त्यात अनेक छोट्या छोट्या मुलांचा बळी जातो असे कथानक आहे.
याबाबत बोलताना राजीव सेन म्हणतो, दिग्दर्शक विभू अग्रवाल यांनी या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. देव राज हा आर्मी ऑफिसर असून ही भूमिका खणखणीत आहे. मी या वेबसिरीजमध्ये काम करतोय असे सुश्मिताला कळले तेव्हा तिला खूपच आनंद झाला. तिच्या एका चित्रपटाच्या वेळी कॅमेर्यामागे उभा असलेला मी आणि आता कॅमेर्याच्या पुढे आलेला मी हा प्रवास तिने पाहिला आहे. मी या भूमिकेचा जास्तीतजास्त अभ्यास करावा आणि अशा प्रकारच्या इतरांनी केलेल्या भूमिका मी पाहाव्यात असे तिचे म्हणणे आहे, असेही तो म्हणतो.