कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या कार्तिकी यात्रेची महाद्वार काल्याने सांगता करण्यात आली. यावेळीही मोजक्याच संख्येने भाविक उपस्थित होते. परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हंडी फोडण्यात आली.
संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाद्वार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विठूरायाने आपल्या खडावा अर्थात पादुका दिल्या होत्या, अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोजक्याच भक्तांना प्रवेश देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेऊन मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर परंपरेप्रमाणे हा काला मार्गक्रमण करीत पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला. या महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता आता झाली आहे.
सौजन्य- सामना