ओबीसी आरक्षण कुणाला धमकावून वा आंदोलन केल्याने मिळालेले नाही, तर घटनेने ते दिलंय. ओबीसी प्रवर्गाचा समावेश मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार झाला असून त्यावर देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात शिक्कामोर्तब केले गेले आहे. त्यामुळे जरा अभ्यास करून बोलावे, असा टोला मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाआडून राजकारण करू पाहणाऱया विरोधकांना कॉँग्रेसचे नेते आणि ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
मराठा समाजासाठी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी कोणी करत असेल तर ती मूर्खपणाची आहे. त्या मागणीला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. राजकीय पोळी शेकण्यासाठी काही लोक उपद्रव करतात, मात्र तो कुठल्या स्तरावरचा असावा हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे. समाजाचे हित बाजूला सारून सत्ता मिळवण्याचे काम कोणी जर करत असेल तर ती गद्दारी आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी मराठा-ओबीसी वाद लावणाऱयांवर निशाणा साधला आहे.
ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करायची ही भाजपची जुनी सवय आहे. पण पेराल तसे उगवते, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे भाजपने या सगळ्या गोष्टी करताना याचे परिणाम नंतरच्या काळात वाईट होतील, याचेही भान ठेवावे, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे.
ओबीसींचा वापर करा आणि फेकून द्या, ही भाजपची नीती
ओबीसींचा वापर करा आणि फेपून द्या, ही भाजपची नीती आहे. खडसे जोपर्यंत भाजपमध्ये होते तोपर्यंत त्यांचा वापर करून घेतला. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांना ईडीची नोटीस पाठवली. ही खरे तर गलिच्छ राजकारणाची सुरुवात असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
सौजन्य- सामना