महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा लवकरच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. पोलिसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्या गुन्ह्याचीही रोमांचक रीतीने उकल करून सांगणारी ही कथामालिका आहे. काही वर्षांपूर्वी याच वाहिनीने ‘लक्ष्य’ या मालिकेतून युनिट-८ टीमची शौर्यगाथा प्रेक्षकांना दाखवली होती.
प्रेक्षकांची हीच अभिरुची पाहून त्यांनी आता ‘नवे लक्ष्य’ ही मालिका आणली आहे. पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट यातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नवे कथानक आणि नव्या टीमसह युनिट-९ची टीम सज्ज झाली आहे. या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली आहे. या मालिकेबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘पोलीस दलाविषयी सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे.
महाराष्ट्र पोलिसांचे कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहेच. वर्दीच्या आतला माणूस आणि त्याचं माणूसपण अधोरेखित करणारे हे नवे लक्ष्य आहे.’