नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने डोंगरीच्या नूर मंजिल इमारतीत छापा टापून अमली पदार्थ बनवणारा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. ड्रग्जचा कारखाना चालवणारा आरिफ भुजवाला हा पळून गेला असून त्याच्या विरोधात एनसीबी लूक आऊट नोटीस (एलओसी) काढणार आहे. कारवाईदरम्यान एनसीबीने आरिफच्या घरातून 12 किलो ड्रग्ज, 2 कोटी 18 लाख रुपये आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केले आहेत.
मंगळवारी एनसीबीने जे. जे. मार्ग येथे कारवाई करून दोघांना अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीत दाऊदचा हस्तक आणि गुंड करीमलालाचा नातेवाईक परवेझ खान ऊर्फ चिंटू पठाणचे नाव समोर आले. परवेझच्या मुसक्या आवळण्यासाठी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे पथक घणसोली येथे गेले. तेथून परवेझ आणि झाकीर हुसेन फझल शेखला ताब्यात घेतले. परवेझकडून 52 ग्रॅम एमडीसह एक पिस्तूल जप्त केले आहे. परवेझला मुंबई पोलिसांनी हद्दपार केल्यावर तो घणसोली येथे राहून ड्रग्जचे नेटवर्क चालवत होता. तो राज्यातील मोठा ड्रग्ज पेडलर असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.
परवेझच्या चौकशीत आरिफचे नाव समोर आल्यावर बुधवारी एनसीबीचे पथक डोंगरीच्या नूर मंजिल इमारतीत गेले. एनसीबीचे पथक येणार असल्याची माहिती समजताच आरिफ हा पळून गेला. त्याच्या घरातून एनसीबीने 2 कोटी 18 लाख रुपये जप्त केले. आरिफने नूर मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ड्रग्ज बनवण्यासाठी एक लॅब तयार केली होती. गेल्या 5 वर्षांपासून ती लॅब सुरू असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. त्या लॅबमधून 12 किलो ड्रग्ज आणि काही केमिकल्स एनसीबीने जप्त केले आहेत. एनसीबीने कारवाईदरम्यान काही महागडय़ा गाडय़ांच्या चाव्या आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. जप्त केलेल्या दोन्ही रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.