भारताच्या संगीत क्षेत्रातील मातृसंस्था इंडियन म्यूझिक इंडस्ट्रीचे (आयएमआय) सदस्य आणि भारतातील गायकांच्या स्वामित्व हक्कासाठी लढणारी इंडियन सिंगर्स राईट्स असोसिएशनच्या (आयएसआरए) सदस्यांमध्ये नुकताच एक ऐतिहासिक करार करण्यात आला. या करारानुसार संपूर्ण भारतातील गायक आणि संगीतकार आणि म्युझिक कंपन्या संगीत क्षेत्रातील लाभ वाटून घेणार आहेत. आयएसआरए आणि आयएमआयच्या सदस्यांनी या ऐतिहासिक कराराचे एकमताने स्वागत केले आहे.
भारतीय संगीत क्षेत्र आणि गायक, संगीतकारांप्रती आपला संपूर्ण पाठिंबा दिल्याप्रकरणी आयएसआरए आणि आयएमआयच्या सदस्यांनी वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानत त्यांची प्रशंसा केली आहे. तसेच गोयल आणि डीपीआयआयटी सोबत काम करण्यास उत्सुकताही दर्शवली आहे. भारतीय संगीत क्षेत्राला प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी संपूर्ण सहकार्य देऊ केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे डिजिटल पायरसीला आळा बसून संगीत क्षेत्राच्या कॉपीराईटला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंडियन सिंगर्स राइट्स असोसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री अनुप जलोटा यांनी याप्रसंगी आनंद व्यक्त करीत म्हटले की, ‘मी भारत सरकारचे आणि विशेषतः पीयूष गोयलजी यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्या पाठिंब्याशिवाय ऐतिहासिक कराराचा हा दिवस उजाडलाच नसता. भारतीय संगीत क्षेत्राला शुभेच्छा देत मी अशी आशा व्यक्त करतो की, हा करार संपूर्ण संगीत उद्योगासाठी फायदेशीर ठरेल.’
‘संगीत ही भारताची मोठी सॉफ्ट पॉवर आहे. आणि भारतीय संगीत उद्योग जागतिक शक्ती बनावा यासाठी या क्षेत्रातील सगळ्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. जेव्हा संगीतकार, गीतकार आणि म्यूझिक कंपन्या एकत्र काम करतात तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. आणि आम्ही ते पाहिलेही आहेत. मला खात्री आहे की जेव्हा कलाकार आणि म्यूझिक कंपन्या एकत्र काम करतील तेव्हा असेच घडेल.’ आयएमआयचे चेअरमन आणि सारेगामा कंपनीचे एमडी विक्रम मेहरा यांनी या शब्दात त्यांची भावना यावेळी व्यक्त केली.
भारतीय गायक हक्क संघटनेचे संस्थापक, संचालक आणि सीईओ संजय टंडन म्हणाले, ‘म्युझिक कंपन्या आणि कलाकार अखेर एकत्र येताना पाहून खूप आनंद होत आहे. आता ही मैत्री संपूर्ण संगीत उद्योगाला उच्च पातळीवर त्वाढण्यास आणि समृद्ध करण्यास सक्षम करेल. हा ऐतिहासिक करार सर्वांसाठी संगीतमय ठरेल यात शंका नाही.’
आयएमआयचे अध्यक्ष आणि सीईओ ब्लेझ फर्नांडिस म्हणाले, ‘हा ऐतिहासिक करार भारतीय संगीत उद्योगासाठी जगातील शीर्ष १० बाजारपेठांमध्ये स्वत:ला पुढे नेण्यासाठी वाढीचे इंजिन ठरेल. जेव्हा संगीत क्षेत्रातील सर्वजण एकत्र काम करतात, तेव्हा एक माधुर्य घडते आणि हे जागतिक स्तरावर घडलेले आहे.’