मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे राणीबागही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. मात्र मुंबईत आता कोरोना रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आल्यामुळे अनेक आस्थापने, कार्यालये, ठरावीक वेळेत सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची सुविधा सुरू झाल्यामुळे राणीबाग पर्यटकांसाठी खुली करण्यासंदर्भात पालिकेच्या माध्यमातून हालचाली सुरू आहेत. याबाबतचा आराखडा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
दररोज दीड लाखाचे नुकसान
राणी बागेत दररोज सुमारे पाच-सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत पर्यटकांची संख्या जात आहे. त्यामुळे याआधी केवळ 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता दररोज एक लाखापासून सहा लाखांपर्यंत वाढले आहे. यामध्ये सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख आणि महिना सरासरी 45 लाखांपर्यंत वाढले आहे. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे राणीबाग बंद असल्याने प्रतिदिवस दीड लाखांचा महसूल बुडत आहे.
अशी केली आहे तयारी
राणी बागेत नियमितपणे पाच ते सहा हजार पर्यटक येत असतात. तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या 15 हजारांपर्यंत जाते. मात्र सद्यस्थितीत कोरोना चांगलाच आटोक्यात आला असला तरी पूर्णपणे गेला नसल्यामुळे आवश्यक काळजी घेऊनच पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.- यामध्ये प्राणी-पक्षांच्या पिंजऱयांजवळ, तिकीट खिडकीजवळ सुरक्षित अंतराचे मार्किंग करण्यात आले आहे. तर ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला पाच ते सहा हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. यापेक्षा जास्त पर्यटक आल्यास प्रवेश देणे बंद करण्यात येईल अशी माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.